Mumbai | आता खैर नाही! नियम मोडणाऱ्यांवर कशी करणार कारवाई? BMCनं तयार केला ऍक्शनप्लॅन
मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे, कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे.
मुंबई कोरोना अपडेट
Follow us on
मुंबई : वाढती कोरोना रुग्णसंख्या (Mumbai Corona Update) मुंबईतील प्रशासनाची डोकेदुखी वाढवते आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नियम अधिक कठोर करण्यासोबत नियमांती कडक अंमलबजावणी करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या जाणार आहेत, याचा ऍक्शनप्लानच (Action plan) बीएमसीनं (BMC) आखला आहे. महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल (Dr Iqbal Chahal) यांनी प्रशासनाची तातडीने बैठक घेवून याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackarey) महानगरपालिका मुख्यालयात महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठकही घेतले आहेत. दरम्यान, आज घेण्यात आलेल्या बैठकीनुसार कोविड प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या हॉटेल आणि उपहारगृहांवर कठोर कारवाई केली आहे.
नियम मोडणाऱ्यांवर अशी करणार कारवाई!
महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आता नियम मोडणाऱ्यांना दणका देण्याच्या तयारी आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्यासाठी आता नियमांचं काटेकोर पालन होणं गरजेचं असल्यानं काही गोष्टी पालिकेनं ठरवल्या आहेत. त्यानुसार आता खालील गोष्टी केल्या जाणार आहेत.
काय काय करणार पालिका?
हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासणार
महानगरपालिका आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक ठेवणार लक्ष
संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱया प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी व त्यासापेक्ष ७ दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे
हवाईमार्गे आलेल्या व लक्षणे नसलेल्या कोविड बाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोविड केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था
मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश
ओमायक्रॉन या कोविड विषाणूच्या प्रसारासह एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढीस लागल्याने राज्य सरकार सतर्क झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी देखील महानगरपालिका प्रशासनाची व्हिसीद्वारे आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱयांवर प्रशासनाची करडी नजर राहणार असून त्यादृष्टिने विविध सूचना देण्यात आल्या आहेत.
महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल म्हटलंय की,
ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार वेगाने होत असून एकूणच कोविड बाधित रुग्णांची संख्याही जलदगतीने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सावधानतेचा इशारा दिल्यानंतर नव्याने कोविड प्रतिबंधात्मक निर्देश देण्यात आलेत. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून खासगी रुग्णालये देखील सुसज्ज होत आहेत.
आयुक्तांनी काय निर्देश दिले?
नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना
हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी. स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱयांचा देखील समावेश करावा.
नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोविड प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱया हॉटेल्स्, उपहारगृहांवर कठोर कारवाई करावी.
सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.
मालाड येथील कोविड उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे. या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
दुबईमधून येणाऱया आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत. या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱया प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल. या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.
हवाईमार्गे मुंबईत येणाऱया आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही, अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोविड उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी. अशा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल. जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स् मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल. या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल.
विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी. जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.
सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत. गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
सर्व रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.
मुंबई कोरोनाचा विस्फोट!
मुंबईत आज आढळून आलेल्या नव्या कोरोना रुग्णांनी पुन्हा धडकी भरवली आहे, कारण मुंबईत कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ झाली आहे, एकाच दिवसात तब्बल 2 हजार 510 नवे कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आल्याने प्रशासनाचे आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे धाबे दणाणले आहेत.