मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : केंद्र सरकारकडून नवं संसद भवन उभारण्यात आलं आहे. या इमारतीचं काही दिवसांआधी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यानंतर आता या इमारतीत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारकडून विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं. या अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसद भवनात पार पडला. मात्र दुसऱ्या दिवसापासून नव्या संसद भवनात कामकाज सुरु करण्यात आलं. यावर विरोधकांकडून टीका करण्यात येतेय. ठाकरे गटाने नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सामनातील या ‘रोखठोक’ सदराच्या माध्यमातून संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ऐतिहासिक संसद भवनास टाळे लागले आहे. तेथे संविधानाचे म्युझियम वगैरे होईल असे सांगितले जाते. नवी इमारत म्हणजे आज तरी गोंधळ दिसत आहे. तेथे इतिहास घडेल काय? त्यासाठी लागणारी टोलेजंग व्यक्तिमत्त्वेच आज नाहीत! जुन्या संसद भवनास विसरता येणे कठीण आहे.
राजधानी दिल्लीतील हिंदुस्थानचे संसद भवन दिमाखात उभे आहे. आणखी किमान शंभर वर्षे त्या भव्य वास्तूस साधा तडाही गेला नसता, पण पंतप्रधान मोदी यांच्या मनात आले म्हणून त्यांनी दिमाखदार ऐतिहासिक संसद भवना’ला टाळे लावले व त्याच आवारात नवे संसद भवन उभे केले. 20 तारखेला विशेष अधिवेशनासाठी मी नव्या संसद भवनात पोहोचलो तेव्हा बाहेर व आत एकंदरीत गोंधळाचेच चित्र होते. जुन्या संसद भवनात प्रवेश करण्यासाठी लोकसभा तसेच राज्यसभेसाठी स्वतंत्र भव्य दरवाजे होते.
लोकसभेसाठी इतर ‘दोन’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते. आत शिरताच एका परिचित पत्रकाराने विचारले, “नवे संसद भवन कसे वाटले?” “हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला शोभेल असे हे संसद भवन अजिबात वाटत नाही. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या लोकशाही मंदिरात प्रवेश केल्यासारखे वाटत नाही,” असे माझे त्यावर उत्तर होते.
दिल्लीत सध्या घामाच्या धारा वाहत आहेत असा उन्हाळा आहे. त्या उन्हात खासदार व कर्मचारी आत शिरण्यासाठी उभे आहेत. लोकसभेला आधी होते तसे दिमाखदार पोर्च येथे नाही. जुने संसद भवन व्यवस्थित आहे. तरीही समोर एक ‘सवत’ दिमाखात उभी करून त्यावर सरकारी तिजोरीतून 20 हजार कोटी रुपये उधळले. हा सर्व अट्टहास कशासाठी?
“स्वातंत्र्यानंतर या इमारतीस संसद भवन म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता है खरे आहे, पण या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम, मेहनत आणि पैसाही आपल्या देशाने गुंतवला,” असे पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भवनाच्या निरोपाच्या भाषणात सांगितले. संसद भवन ही प्रेरणादायी व तजेलदार वास्तू असते. अशा इमारती वृद्ध व जर्जर होत नाहीत. त्यांना बाद करणे भारतमातेस ‘वृद्ध’ झाल्याचे सांगत वृद्धाश्रमात ढकलण्यासारखे आहे.