मुंबईतील शाळेत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेवर हमाससंदर्भात सहानुभूती दर्शवणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे. मुंबईतील सोमय्या शाळेत गेल्या 12 वर्षांपासून काम करणाऱ्या परवीन शेख यांच्याबाबत हा प्रकार घडला आहे. शेख यांची या प्रकरणात चौकशी सुरु होती. चौकशीनंतर त्यांना राजीनामा देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. यामुळे त्यांना नोकरीवरुन काढून टाकले. दरम्यान या प्रकाराबाबत बोलताना परवीन शेख यांनी सोमय्या शाळेने आपणास कोणतीही नोटीस न देता बेकायदेशीररित्या पदावरुन हटवल्याचे म्हटले आहे.
सध्या पॅलेस्टाईन (हमास) आणि इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धात हमासला सहानुभूती दर्शवणारी पोस्ट परवीन शेख यांनी केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. यासंदर्भातील २४ एप्रिल रोजी एका संकेतस्थळावर वृत्त आले होते. त्याची दखल घेत सोमय्या शाळा व्यवस्थापनाने परवनी शेख यांची चौकशी सुरु केली. या चौकशीनंतर त्यांना २६ एप्रिल रोजी राजीनामा देण्यास सांगितले. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही.
त्यांनी आपले काम सुरुच ठेवले.
सोमय्या शाळेच्या व्यवस्थापनाने परवीन शेख यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शेख यांनी सोमवारी ६ मे रोजी लेखी म्हणणे सादर केले. त्यात त्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. त्यांनी केलेला लेखी खुलासा आणि या प्रकरणाची करण्यात आलेल्या चौकशी प्रक्रियेनंतर त्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेने यासंदर्भात म्हटले की. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संपूर्णपणे समर्थन करतो, परंतु मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केलेली भूमिका ही ‘सोमय्या व्यवस्थापन’ जपत असलेल्या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे.
दरम्यान या प्रकाराबाबत परवीन शेख म्हणतात, मला 12 वर्षांच्या सेवेनंतर पदावरून हटवले. या प्रकाराचा मला प्रचंड बसला आहे. 12 वर्षे सेवा देऊनही शाळा व्यवस्थापने सोशल मीडियावरील खोट्या अफवांना बळी पडत माझ्यावर कारवाई केली आहे. ही कारवाई राजकीय दबावापोटी केली आहे. या कारवाई विरोधात मी कोर्टात जाण्याचा विचार करत आहे.