महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक घडामोडी घडणार आहेत. कारण आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीआधी देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला. या निवडणुकीनंतर राज्यात 26 जूनला विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये कोकण विभाग पदवीधर, मुंबई पदवीधर, मुबंई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. या चारही जागांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही जागांचा निकाल आता समोर आला आहे. या दोन्ही जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दोन्ही शिलेदार या मतदारसंघात विजयी झाले आहेत. त्यामुळे मुंबई ही ठाकरेंचीच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचं गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्ता आहे. पण आता शिवसेनेत फूट पडली आहे. या फुटीनंतर लोकसभा निवडणूक पार पडली. ठाकरेंनी मविकास आघाडीकडून आपल्या पक्षाचे 4 उमेदवार मुंबईतील लोकसभांच्या जागांवर उभे केले होते. या चार पैकी तीन जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर चौथे उमेदवार अमोत कीर्तिकर यांचा अतिशय कमी म्हणजे अवघ्या 48 मतांनी निसटता पराभव झाला. यानंतर विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर मुंबईवर पुन्हा ठाकरेंचंच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक पसंतीक्रमाची 4 हजार 83 मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले, अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी केली.