रविवार म्हटला की सुट्टीचा वार! या दिवशी सरकारी कार्यालये, अनेक खासगी कार्यालये यांना सुट्टी असते. त्यामुळे बहुतेक कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. पण सुट्टीचा वार असल्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे, मित्रांकडे किंवा फिरण्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी जातात. यासाठी हजारो प्रवासी हे मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतात. तसेच अनेक खासगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी या दिवशीसुद्धा कामाला जातात. अशा कर्मचाऱ्यांची संख्या लाखात असेल. त्यामुळे मुंबई कधीच थांबत नाही, असं मानलं जातं. विशेष म्हणजे रविवारी मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल देखील धावत असते. पण तरीही पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे मार्गावर दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो. तसा या रविवारी देखील तीन मार्गांवर मेगा ब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक कसा असेल? याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येत्या रविवार 15 डिसेंबरला मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे अप (मुंबईच्या दिशेला येणाऱ्या) मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन करण्यात येणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.
खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.