अविनाश माने, मुंबई | दि. 8 मार्च 2024 : टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांना धक्का बसणार आहे. कंपनीच्या वीज दरांस वाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. ही दरवाढ येत्या एक एप्रिलपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीपेक्षा २४ टक्के जास्त दर टाटा कंपनीच्या वीज ग्राहकांचे असणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गुरुवारी सरासरी २४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यास मंजुरी दिली. दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ आहे. परंतु एकूण १०१ ते ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ही दर वाढ अधिक असणार आहेत.
टाटा कंपनीने निवासी ग्राहकांसाठी दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे सादर केला. त्यास जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर कंपनीने सुधारित दर प्रस्ताव सादर केला होता. कंपनीने गेल्या दोन वर्षांत या संवर्गासाठी आयोगाने मंजूर केलेली दरवाढ लागू केली नव्हती. त्यामुळे आता हे दर वाढविले जाणार आहेत. यामुळे आता ०-१०० युनिटसाठी विजेचे दर ५.३३ असणार आहे. हे दर ५०१ पेक्षा जास्त युनिटसाठी १५.७१ असणार आहे.
इंधन व अन्य खर्चात वाढ झाली असून एकूण वीज खरेदीमध्ये हरित ऊर्जेचे प्रमाणही आयोगाने ठरवून दिले आहे. त्यानुसारची वीज खरेदी, पायाभूत सुविधा खर्च आदींमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. टाटा वीज कंपनीचे निवासी ग्राहकांसाठीचे दर अन्य वीज कंपन्यांपेक्षा वाढण्याची शक्यता असल्याने काही ग्राहक अन्य कंपन्यांकडे जाण्याची चिन्हे आहेत. त्यातून वीज कंपन्यांमध्ये दरांची स्पर्धाही होण्याची चिन्हे आहेत. आयोगाने महसुलातील तूट भरून काढण्यासाठी २३-२४ मध्ये मंजूर केलेले वाढीव वीजदर लागू न केल्याने ही वाढ मान्य करण्यात आली.
युनिट / वीज दर (युनिटनिहाय दर रुपयांत)
वीज खरेदी दरात कपात करून ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी टाटा कंपनी कटीबद्ध असून इंधन समायोजन आकार नसल्याने पुढील काळात वीजदरात कपातही होऊ शकते, असे कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, करण्यात आलेल्या दरवाढीवरुन नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.