सुनिल जाधव, डोंबिवली, दि.29 डिसेंबर | २०२३ वर्षाला निरोप देण्यास अवघे दोन दिवस राहिले आहे. युवक, युवतींनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याची जोरदार तयारी केली आहे. त्याच वेळी पोलिसांनीही जोरदार तयारी केली आहे. पुणे, मुंबई, ठाणे डोंबिवलीत थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. डोंबिवलीत जागोजागी नाकाबंदी करत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम राबवत आहे. तळीरामांचा थर्टी फर्स्ट फिवर उतरेपर्यंत ही मोहीम सुरु ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी मोटर सायकल, कार, रिक्षा चालकासह इतरही वाहन चालकांची तपासणी सुरु केली आहे. मद्यपान करून गाडी चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून दहा ते पंधरा हजार पर्यंत दंड करणे आणि परवाना देखील रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री दारू पिऊन नशेत वाहन चालवण्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना अधिक घडतात. वाहनचालकांनी दारू पिऊन गाडी चालवू नये, असे आवाहन करूनही वाहानचालकाकडून भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आता हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज झाली असून कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जागोजागी नाकाबंदी लावत ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची मोहीम हाती घेतली आहे.
डोंबिवलीत वादविवाद, अपघाताच्या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी तळीरामांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. इतर दिवसांच्या तुलनेत 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीपासूनच आणखी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करून तळीरामांची झिंग उतरविण्यात येणार आहे. मद्यपान करून गाडी चालवताना सापडेल त्याच्यावर मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार येत आहे. यामध्ये संबंधित तळीरामांचा वाहन परवाना देखील रद्द केला जात आहे. त्याच बरोबर दहा ते पंधरा हजार पर्यंत दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या 24 तासांत 15 पेक्षा अधिक जणांवर कारवाई करत लाखोचा दंड देखील वसूल केला आहे. दारू पिऊन गाडी चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून केले जात आहे.