मुंबई : मुंबईत काल (बुधवारी) रात्री दमदार कोसळलेल्या पावसाने आज (गुरुवार 19 सप्टेंबर) सकाळच्या सुमारास मात्र विश्रांती घेतली आहे. परंतु शालेय शिक्षण मंत्र्यांनी खबरदारी म्हणून आधीच आज मुंबई-ठाण्यातील शाळा-कॉलेजेसना सुट्टी (Mumbai School Colleges Closed) जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक बिनपावसाच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत.
येत्या 24 तासात मुंबईसह रायगड, कोकण, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकण भागातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी (Mumbai School Colleges Closed) जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या इतर भागातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय हवामानाची स्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आला आहे.
In view of heavy rainfall forecasts. As a precautionary measure, holiday is declared for all schools & junior colleges in Mumbai, Thane, Konkan region for today 19 Sep 2019. District collectors in other parts of Maharashtra to decide, based on local conditions. #rain
— ashish shelar (@ShelarAshish) September 18, 2019
शाळा शनिवारीही खुल्या?
गेल्या आठवड्यात गौरी-गणपती आणि त्याआधीही पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा-कॉलेजेसना सुट्टी मिळाली होती. त्यामुळे अपूर्ण राहिलेला अभ्यासक्रम भरुन काढण्यासाठी काही शाळा शनिवारीही सुरु ठेवण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचा निर्णय प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनाकडून घेतला जाणार आहे.
मुंबईकरांना सावधतेचा इशारा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रत्नागिरी परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईकरांनी समुद्राजवळ आणि पाणी साचलेल्या सखल भागात जाणं टाळावं, असं आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कडकडाट आणि गडगडाट
मुंबईत बुधवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश भागांमध्ये विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शाळा-कॉलेजेससह ऑफिसला दांडी मारण्याची तयारी अनेकांनी केली होती. मात्र शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आपसूकच आनंद झाला. तर पावसाचा जोर ओसरल्याने ऑफिसला दांडी मारण्याच्या विचारात असलेल्या मुंबईकरांचा हिरमोड झाला.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे वगळले, तर फारशा कुठल्याच सखल भागात पाणी साचलेलं नाही. त्यामुळे रस्ते वाहतूक तूर्तास सुरळीत आहे. त्याचप्रमाणे पश्चिम, मध्य किंवा हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल सेवेवरही कोणताही परिणाम झालेला नाही.