मुंबईत लवकरच सिंगापूरच्या (Singapore) धर्तीवर ट्री वॉक हा प्रकल्प साकरला जाणार आहे. या ट्री वॉक (Mumbai Tree walk) अर्थात गर्द झाडींतून निघणाऱ्या वाटेवर चालताना नागरिकांना एक सुखद अनुभव देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. प्रदूषणाचे दररोजचे वाढते निर्देशांक, उंचच उंच भिंतींमुळे आकाशाचेही दुर्लभ दर्शन , लोकलची भागदौड या सगळ्यांमुळे मुंबईकरांना नेहमीच निसर्ग सहवासाची ओढ लागलेली असते. मुंबईकरांची ही इच्छा ट्री वॉक या प्रकल्पाद्वारे पूर्ण होऊ शकते, अशी आशा केली जात आहे.
मुंबई महापालिकेतर्फे सिंगापूरच्या धर्तीवर मलबार हिल परिसरात ट्री वॉक उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. मलबार टेकड्यांमधील कमला नेहरू उद्यानाजवळ हा प्रकल्प असेल. पुढील वर्षभरात हा प्रकल्प उभारला जाईल. या ट्री वॉकमध्ये पारदर्शक काचेचा वापर केला जाईल. त्यामुळे नागरिकांना झाडांवर चालतोय, असाच भास होईल. तसेच दर 150 मीटर अंतर चालल्यानंतर नागरिकांना बसण्यासाठी सोय असेल. ब्रिटिश कालीन पाइपलाइनच्या चेंबरवर व्ह्युइंग डेक असेल. तसेच या मार्गावर सुरक्षेकरिता ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील.
गिरगाव चौपाटीवरून मलबार हिलवर लोक पायऱ्या चढून जातात. काही लोक रस्त्याद्वारे वाहनांनी तिथवर पोहोचतात. मात्र पायऱ्या चढून जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यात मुंबईकरांसह पर्यटकांचीही संख्या जास्त असते. याच ठिकाणी मुंबई महापालिका ट्री वॉक उभारणार आहे.
बीएमसी या प्रकल्पासाठी 12.66 कोटी रुपये खर्च करेल, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हा प्रकल्प कमी वेळेत पूर्ण होईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे. टेकडीवर हा प्रकल्प पूर्ण करण्याचे काम आव्हानाचे आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीदरम्यान नुकसान झाल्यास पाच वर्षांपर्यंत दुरुस्तीही केली जाईल.
इतर बातम्या-