सत्तांतरानंतरच्या मुंबईतल्या सर्वात पहिल्या निवडणुकीला स्थगिती का? अखेर प्रशासनाकडून स्पष्टीकरण

| Updated on: Aug 18, 2023 | 11:17 PM

मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक काही कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. या स्थगितीच्या निर्णयावरुन मुंबईतील राजकारण प्रचंड तापलं होतं. अखेर यावर प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण जारी करण्यात आलं आहे.

सत्तांतरानंतरच्या मुंबईतल्या सर्वात पहिल्या निवडणुकीला स्थगिती का? अखेर प्रशासनाकडून स्पष्टीकरण
Follow us on

निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 18 ऑगस्ट 2023 : मुंबई विद्यापीठाने गुरुवारी (17 ऑगस्ट) रात्री उशिरा पत्रक काढून सिनेट निवडणुकीला स्थगिती दिली. विद्यापीठाच्या या निर्णयावरुन मुंबईच्या राजकारणात चांगलंच रान पेटलं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरु भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. दोन्ही नेत्यांनी मुंबई विद्यापीठाला निवडणुकांना स्थगिती देण्यामागील सविस्तर स्पष्टीकरण मागितलं होतं. अखेर मुंबई विद्यापीठाकडून याबाबतचं सविस्तर स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं आहे.

“महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 मधील कलम 28 (2) (न) मधील तरतूदीनुसार अधिसभेवर 10 नोंदणीकृत पदवीधर निवडून देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने सर्व संबंधिताना कळविण्यात आले होते. 9 ऑगस्ट 2023 ला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी (सुधारीत) प्रसिद्ध करण्यात आली होती. 17 ऑगस्ट 2023 ला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यापीठास अंतिम मतदार यादी (सुधारीत) यामध्ये काही विसंगती असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याचे कळविण्यात आले”, असं मुंबई विद्यापीठाने सांगितलं आहे.

‘तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही’

“सदर विसंगतीची तात्काळ सखोल चौकशी करून त्याच दिवशी अहवाल सादर करण्यास कळविले. त्या अनुषंगाने विद्यापीठाने मतदार यादीतील मतदारांची मोठी संख्या पाहता विसंगतीबाबत तात्काळ कार्यवाही करणे शक्य होणार नाही, तसेच याबाबत योग्य ती सखोल चौकशी करण्याकरीता विद्यापीठास वेळ आवश्यक असल्याने शासनाने विद्यापीठास योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली”, असं विद्यापीठाने म्हटलं आहे.

“त्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रामध्ये मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी होऊनच निवडणूक प्रक्रिया होणे आवश्यक असल्याने मतदार यादी सुधारीत करून निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठाला निर्देश दिले. या प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने विद्यापीठाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार पुढील आदेशापर्यंत निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे परिपत्रक निर्गमित करण्यात आले”, असं स्पष्टीकरण मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलं आहे.

“पुढील निवडणूक प्रक्रियेबाबत वेळोवेळी विद्यापीठ निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देईल. तरी सर्व संबंधितानी याबाबतची नोंद घ्यावी”, असंही मुंबई विद्यापीठाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.