मुंबई विद्यापीठात शिवसेना vs राज्यपाल संघर्ष तीव्र, कोश्यारींनी शिफारस केलेल्या कंपनीवरुन वाद

| Updated on: Feb 05, 2021 | 3:39 PM

शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतलेला प्रस्ताव कुलगुरुंनी मंजुरीसाठी पुन्हा व्यवस्थापन परिषदेपुढे आणला (Mumbai University Yuvasena Vs Governor)

मुंबई विद्यापीठात शिवसेना vs राज्यपाल संघर्ष तीव्र, कोश्यारींनी शिफारस केलेल्या कंपनीवरुन वाद
Follow us on

मुंबई : मुंबई विद्यापीठात (Mumbai University) शिवसेना विरुद्ध राज्यपाल वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतलेला प्रस्ताव कुलगुरुंनी मंजुरीसाठी पुन्हा व्यवस्थापन परिषदेपुढे आणला. मुंबई विद्यापीठातील विकास कामांसाठी आयआयएफसीएल (IIFCL) कंपनीला सल्लागाराचे काम देण्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी विद्यापीठाला सुचवले होते. (Mumbai University Shivsena Yuvasena Vs Governor Bhagatsingh Koshyari)

राज्यपालांचा प्रस्ताव मागे घेण्याची कुलगुरुंवर नामुष्की 

IIFCL कंपनीला काम देण्याचे राज्यपालांचे शिफारस पत्र आणि प्रस्ताव कुलगुरुंनी 11 जानेवारीला झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडला होता. मंजुरीसाठी अचानक मांडलेल्या या प्रस्तावावर युवासेनेच्या सिनेट सदस्यांसह व्यवस्थापन परिषदेतील अन्य सदस्यांनीही आक्षेप घेतला होता. त्यामुळे राज्यपालांनी सुचवलेला प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की कुलगुरुंवर ओढावली होती. येत्या सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत गदारोळ होण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठ सक्षम, युवासेनेचा सवाल

प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी आणल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, अशी भूमिका युवासेना सिनेट सदस्यांनी मांडली होती. मुंबई विद्यापीठाची सक्षम यंत्रणा असताना बाहेरच्या कंपनीला काम का द्यावे? असा मुद्दा युवासेनेने उपस्थित केला होता. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

आधीच राज्यपाल नामनिर्देशत 12 सदस्यांच्या नियुक्तीवर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या तणाव आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

टेनिस कोर्टात गुरं चरायला

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील मोकळ्या जागेत गुरं चारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानात टेनिस कोर्ट असेलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग होत नसल्यामुळे या ठिकाणी गुराखी गुरांना घेऊन येत असल्याचं उघड झालं होतं. युवासेनेच्या सिनेट (senate) सदस्यांनी या जागेची पाहाणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.

संबंधित बातम्या :

मुंबई विद्यापीठात गुरांचा वर्ग, कलिना कॅम्पसमधील टेनिस कोर्टात गुरं चरायला

(Mumbai University Shivsena Yuvasena Vs Governor Bhagatsingh Koshyari)