मुंबई: आगामी काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशी माहिती दिली आहे. परळ आणि नायगावात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद असेल. या दोन्ही ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते 6 ऑक्टोबरच्या सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
यानंतर अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दोन्ही ठिकाणी 6 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पाणीपुरवठा खंडित होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.
जलवाहिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात देखभाल दुरुस्तीचे काम केले जाईल. बीएमसीने या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी आवश्यक पाणी ठेवावे असे आवाहन केले आहे.
देखभालीच्या कामामुळे काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत त्याचबरोबर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येईल. लोकांना उत्तम दर्जाचे स्वच्छ पाणी देण्यासाठी हे देखभालीचे काम वेळोवेळी केले जाते, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली.
पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake ) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाव परिसरात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वैतरणा, तानसासह इतर सर्व तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा (mumbai water supply lake) जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी 3800 दशलक्ष अर्थात 380 कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो.
संबंधित बातम्या:
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मिळतोय युनिव्हर्सल पास, जाणून घ्या फायदे
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा; Electric Car रॅलीत आदित्य ठाकरेंचं आवाहन