मुंबई, आधीच पावसाने बेहाल झालेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईत 17 आणि 18 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली (heavy rainfall alert) असून यलो अलर्ट जारी केला आहे. सोमवारी, मंगळवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. IMD ने मंगळवारपर्यंत मुंबई (Mumbai), ठाणे, रायगड, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर राज्यातील हवामान सामान्य राहील आणि मान्सून निघून जाईल, असा अंदाज विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
याआधी, गेल्या दशकभरात ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात या वर्षी एवढा पाऊस पडला नाही. शुक्रवारी मान्सूनने महाराष्ट्राच्या उत्तर भागातून प्रस्थान केल्याचे बोलले जात असून आता राज्याच्या इतर भागातूनही मान्सून परतण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळपर्यंत मुंबईत 216 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 1998 मध्ये मुंबईत 376 मिमी म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. या वर्षी, सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवले की 8 ऑक्टोबर रोजी 113 मिमी पावसाची नोंद झाली, जी गेल्या दशकातील ऑक्टोबरमधील एका दिवसातील उच्चांक आहे.
हवामान खात्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मान्सून लवकरच महाराष्ट्रातून परतणार आहे. तत्पूर्वी सोमवार आणि मंगळवारी अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता असून, त्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार बुधवारी हवामान कोरडे राहील आणि गुरुवारी हलका पाऊस पडेल आणि त्यानंतर मान्सून निघून जाईल. सध्या सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.