आणखी एक मराठी महिला अडचणीत, एका गुजराती व्यक्तीने थेट… काय घडलं कांदिवलीत?

| Updated on: Sep 30, 2023 | 3:05 PM

मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला गाळा नाकारण्यात आल्याने त्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. ही घटना ताजी असतानाच आणखी एक...

आणखी एक मराठी महिला अडचणीत, एका गुजराती व्यक्तीने थेट... काय घडलं कांदिवलीत?
Mumbai woman
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गोविंद ठाकूर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : तृप्ती देवरुखकर या महिलेला मुलुंडमध्ये एका गुजराती व्यक्तीने गाळा नाकारला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला. मनसेने तर थेट या व्यक्तीला जाब विचारून त्याला माफी मागायलाही लावली. या व्यक्तीविरोधात तक्रारही दाखल झाली. त्याला अटकही करण्यात आली आणि जामीनही मिळाला. हा प्रकार थांबलेला असतानाच आता आणखी एक नवीन प्रकार समोर आला आहे. आणखी एका मराठी महिलेची अडवणूक केल्याचं उघड झालं आहे.

मुलुंडपाठोपाठ कांदिवलीतही मराठी महिला अडचणीत आली आहे. मुंबईत गुजराती आणि मराठीचा मुद्दा चर्चेचा विषय झालेला असतानाच मुलुंडच्या घटनेनंतर आता आणखी काही गोष्टी समोर येत आहेत. कांदिवली येथे एका ज्येष्ठ मराठी महिलेने परमार नावाच्या गुजराती व्यक्तीवर तिचा गाला बळकावल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एफआयआर दाखल करा

रिटा दादरकर असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने या प्रकाराची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कांदिवली पोलीस ठाणे गाठले. तसेच या महिलेची तक्रार नोंदवून घेण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली. या प्रकरणी एफआयआर दाखल करून घेण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

न्यायाची अपेक्षा आहे

या प्रकारावर रिटा दादरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजपर्यंत आम्हाला कोणीही मदत केली नव्हती. पण मनसेने आम्हाला मदत केली. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास सांगितले, आम्हाला पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा आहे, असं रिटा दादरकर यांनी म्हटलं आहे.

मोर्चाचा इशारा

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे, मात्र आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत एफआयआर नोंदवला नाही तर आम्ही डीसीपी कार्यालयावर मनसे स्टाईलमध्ये मोर्चा काढू, असा इशारा मनसेचे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी एफआयआर नोंदवून घेतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.