मुंबई : नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पहिलवानांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पहिलवान रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे पहिलवानांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. याच आंदोलनाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता थेट भारतरत्न आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला घेरलं आहे. युथ काँग्रेसने सचिन तेंडुलकर यांच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत सचिनला सवाल केले आहेत.
युथ काँग्रेसने बुधवारी सचिन तेंडुलकरच्या बंगल्याबाहेर एक पोस्टर लावलं आहे. पहिलवानांच्या आंदोलनावर सचिन तेंडुलकरने अद्यापही भाष्य केलेलं नाही. सचिनने मौन पाळल्याबद्दल त्यावर या पोस्टरमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सचिनच्या घराबाहेर हे पोस्टर लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन हे पोस्टर हटवलं आहे.
या पोस्टरमधून सचिन तेंडुलकरला तीन सवाल करण्यात आले आहे. मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? असा सवाल या पोस्टरवर मोठ्या अक्षरात केला आहे. त्यानंतर सचिनला तीन सवाल करण्यात आले आहेत.
सवाल क्रमांक- एक
शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की, आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नकोस. आणि आज मात्र सचिन तुझे देशप्रेम कुठे गेले?’
सवाल क्रमांक – दोन
सीबीआय, इन्कम टॅक्स, या सगळ्यांच्या धाडी पडतील म्हणून तू कुठल्यातरी दबावाखाली आहेस काय?
सवाल क्रमांक – तीन
क्रीडा विश्वातील तुम्ही देव माणूस आहात. एक भारतरत्न देखील आहात. मात्र जेव्हा खेळ विश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि तुमच्यातील माणुसकी कोठेही दिसून येत नाही.
दरम्यान, पहिलवानांच्या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे. राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पहिलवानांच्या आंदोलनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. महिला पहिलवानांचा आपल्याला अभिमान आहे. आपण त्यांनी देशाची लेक म्हणून संबोधतो. त्यांच्या मेहनतीमुळे देशाला अनेक पदके मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा नावलौकिक झाला आहे. त्यांच्यावरच आज अन्याय होत आहे. त्यांना आंदोलन करावं लागत असून न्याय मिळत नाही. हे योग्य नाही, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
Mumbai Youth Congress puts up a poster to question Sachin Tendulkar’s silence on Women wrestler’s issue.. pic.twitter.com/rOqROEpVoZ
— Spirit of Congress✋ (@SpiritOfCongres) May 31, 2023
या महिला खेळाडूंनी न्यायाची मागणी केली आहे. कोणत्याही दबावाखाली त्यांना न्याय मिळाल पाहिजे. 28 मार्च रोजी जे झालं ते पुन्हा होणार नाही याची आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिलवानांचं म्हणणं ऐकतील आणि त्यांना न्याय देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलं आहे.