दहीहंडी फोडणाऱ्या मंडळींचा म्हणजेच गोविंदांच्या कौशल्याची कसोटी ठरणारी प्रो गोविंदा लीग यंदा येत्या रविवारी 18 ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे. या लीगमध्ये 16 संघांना निमंत्रित करण्यात आले असून रोख रकमेची बक्षीसे दिली जाणार आहेत.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. गतवर्षी पहिल्यांदाच गोविंदा लीग स्पर्धांचे प्रो कबड्डी स्पर्धेच्या धरतीवर आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन यंदाही या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संस्थापक व अध्यक्ष, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे संचालक मजहर नाडियादवाला, प्रो गोविंदा लीगचे संचालक मोहम्मद मोरानी उपस्थित होते.
यातील सर्वाधिक संघ हे मुंबई व ठाणे येथील आहेत. ही स्पर्धा डोम एसव्हीपी स्टेडियम मध्ये आयोजित केली जाणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघास 25 लाख रुपये तर उपविजेत्या संघाला 15 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे 10 लाख आणि 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे त्याखेरीज उर्वरित 12 संघांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. ही पारितोषिके लीग संयोजकांतर्फे दिली जाणार आहेत.
लीग मधील फ्रॅंचाईजी मालकांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये कोणताही गोविंदा जखमी होऊ नये म्हणून लीगने केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली गेली. गोविंदा पथकातील प्रत्येकाची आहारापासून वैद्यकीय सुविधापर्यंत सर्व व्यवस्था फ्रॅंचाईजीतर्फे केली जाणार आहे. तसेच पथकांच्या सरावासाठी जागाही उपलब्ध केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे सर्वच क्रीडाप्रेमी असल्यामुळे या लीगला राज्य सरकारचे समर्थन प्राप्त झाले आहे आणि तसेच लीगमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व गोविंदांसाठी सरकारने विमा दिला आहे.
गोविंदाची मागणी लक्षात घेऊन यंदा सहभागी होणाऱ्या एक लाख नोंदणीकृत गोविंदाचा शासनातर्फे विमा उतरविण्यात येणार आहे. आतापर्यंत 14 हजार गोविंदांनी आपली नोंदणी केली असून एक लाख पर्यंत ही नोंदणी होईल अशी अपेक्षा आहे. या स्पर्धांचे स्टार्स स्पोर्ट्स वाहिनीवर प्रक्षेपण केले जाणार आहे. गोविंदा प्रेमी लोकांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन गोविंदांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन श्री सामंत यांनी केले.