मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. या राजीनाम्यानंतर नाना पटोले यांनी मंत्रिपद दिलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारु, असं उत्तर त्यांनी दिलं. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली (Nana patole reaction after resigns as Assembly Speaker).
नाना पटोले नेमकं काय म्हणाले?
“पाणी वाहतं राहिलं तर ते स्वच्छ असतं. यापुढे आता पक्ष जी काही जबाबदारी देईल ती जबाबदारी स्वीकारेल आणि त्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पक्षाध्यक्षांनी जो आदेश दिला त्यानुसार मी तुमच्या सगळ्यांसमोर राजीनामा दिला. आता विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण ते तीनही पक्षांचे हाय कमांड निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली (Nana patole reaction after resigns as Assembly Speaker).
“तीन पक्षांचं सरकार आहे. सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमानुसार सर्व ठरवण्यात आलं आहे. या सर्वांमागे राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं हीच या सरकारची भूमिका आहे”, असं नाना पटोले म्हणाले. “कोरोना काळात सरकारने चांगलं काम केलं आहे. विपरीत परिस्थितीत सरकारने चांगलं काम केलं आहे”, असंदेखील ते यावेळी म्हणाले.
“ज्या खुर्चीला बसलो त्या खुर्चीला शंभर टक्के न्याय द्यायचा, अशी माझी भूमिका राहिलेली आहे. ती खूर्ची जनतेची असते. त्यामुळे त्या खुर्चीतून जनतेला न्याय मिळावं. ती खूर्ची जनतेसाठी कसं न्याय देते ते मी दाखवून दिलं आहे”, असं पटोले म्हणाले.
“आम्ही तिघं भांडण्यासाठी एकत्र आलेलो नाहीत. तर राज्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. ते आम्ही व्यवस्थित करत आहोत”, असं मत त्यांनी मांडलं.
“मी राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या अध्यक्ष असताना देशपातळीवर काम केलं आहे. मी या माध्यमातून अनेक राज्यांमध्ये संघटनेचं काम केलं आहे. त्यामुळे घटनात्मक काम करायला आवडतं. पक्षाने मला त्यासाठी संधी दिली”, असं पटोले यांनी सांगितलं
“राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांसोबत चर्चा झालेली. इतर घटक पक्षांसोबत चर्चा झाली. मी त्यांचे आभारही मानले. विरोधी पक्षानेही सहकार्य केलं”, असंदेखील नाना पटोले यांनी सांगितलं
संबंधित बातम्या :
नाना पटोलेंनी राजीनामा दिला; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?
‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ म्हणणारा आमदार विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी