मुंबई: ‘मी पंतप्रधानांबद्दल बोललो नाही, माझ्या मतदारसंघातल्या गुंडाबद्दल बोललो’ हा नाना पटोले यांचा खुलासा धादांत खोटारडेपणा आहे’, असा आरोप करतानाच ‘नाना पटोलेनी ह्या गावगुंडाचे छायाचित्र आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हान महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिलं आहे.
महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून हे आव्हान दिलं आहे. ‘स्वत:च्या मतदारसंघात जनतेला त्रास देणाऱ्या गावगुंडाचा कायदेशीर बंदोबस्त करण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष वापरत नाही, हे महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे खरे चित्र आहे, असे सांगत ‘महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रदेश अध्यक्ष कायद्याचे संरक्षण जनतेला देऊ असे न म्हणता कायदा झुगारून खून करण्याची भाषा वापरतो, ही वस्तुस्थिती भयावह आहे, असं भंडारी यांनी म्हटलं आहे.
कायद्याचे राज्य ही कल्पनाच काँग्रेसला मान्य नाही आणि केवळ खूनखराब्याचे राजकारण करणे हाच काँग्रेसचा स्वभाव आहे हे आता स्पष्ट झाले आहे. केवळ हिंसाचारावर अवलंबून असणाऱ्या काँग्रेस संस्कृतीचे नाना पटोले हे अस्सल प्रतिक आहेत’ अशी टीका देखील भंडारी यांनी केली आहे.
दरम्यान, पटोले यांनी केलेल्या विधानावर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत नाना पटोले यांचावर गुन्हा दाखल केल्याची प्रत मिळत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनमधून हलणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर नाना पटोलेंवर का नाही?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी चंद्रशेखर बावनकुळेंसहीत भाजपच्या इतर कार्यकर्त्यांची धरपकड केली.
पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलीस भाजपाच्या लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांनाच अटक करीत आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी असा हा प्रकार असून पोलिसांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
आपण पंतप्रधानांबद्दल बोललोच नव्हतो असा खुलासा पटोले यांनी केला असून हा खुलासा हास्यास्पद आहे. चोर तो चोर वर शिरजोर असाच हा प्रकार आहे. नारायण राणे यांना अटक करताना जो न्याय लावला तोच न्याय पटोले यांनाही लावावा. पंतप्रधानांबद्दल संतापजनक वक्तव्य करणाऱ्या पटोलेंविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास पोलीस तयार नाहीत. कोरोनाविरोधी लसीकरणाच्या मोहिमेत देशाने उच्चांकी आघाडी घेतलेली असताना महाराष्ट्रात मात्र ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळे लसीकरणाचा वेग थंडावल्याने कोरोनाचे भय कायम राहिले आहे, असा थेट ठपका उपाध्ये यांनी यावेळी ठेवला.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 18 January 2022 pic.twitter.com/9vGqyCyqam
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2022
संबंधित बातम्या: