मुंबई: मुंबईतील वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्र्यांना दुसरं काही समजत नाही का? राणा कुटुंब घराच्या बाहेर पडणार असतील तर त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढा. पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं. त्यांना जर अडवलं तर त्यांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मी स्वत: राणांच्या (navneet rana) घरी जाईल. बघू कोण येतो. मर्द आहेत ना? या तिकडे. त्या आधी पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत शिवसैनिक, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेनेवर (shivsena) हल्लाबोल केला. राणा दाम्पत्यांविरोधात केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. केस घ्या म्हणून सांगत होते. कशाची केस? काय केलं त्यांनी? एक खासदार आणि आमदार त्यांच्या जीविताला काही झालं मुंबईत तर राज्य सरकार जबाबदार असेल. बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देत नाही. आता राणांना फोन करतो. तुम्हाला मदत हवी असेल तर मी येतो म्हणून सांगतो, असंही राणे म्हणाले.
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातील वातावरण पाहिल्यामुळे ही पत्रकार परिषद मुद्दाम घेतली आहे. राज्यात सरकार आहे असं वाटत नाही. सरकारी पक्षच मुंबईतलं वातावरण बिघडवू पाहत आहे. या सर्वांना राऊत, परब जे कोण आहेत त्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे की नाही याचं भान आहे? सत्ता असतानाही ते चॅलेंज देत आहेत. संजय राऊत तर थेट स्मशानात पोहोचवण्याची भाषा करत आहेत. हा गुन्हा नाही का? या धमक्या सुरू असताना राज्यात पोलीस आहे की नाही याचा मला शंका आहे. माफी नाही मागितली तर घरातून बाहेर पडू देणार नाही हा गुन्हा नाही? काय करत आहेत पोलीस? असा सवाल राणेंनी केला.
राणा अमरावतीच काय मातोश्रीच्या दारापर्यंत आल्या. कुठे आहे शिवसेना? शिवसेना झोपली होती का? संजय राऊत उगाच बढाया मारत होते. हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमल्याचं सांगत होते. पण मातोश्रीबाहेर 235च्या पुढे एकही शिवसैनिक नव्हता. राणांच्या घरासमोर 125 शिवसैनिक होते. अन् हजारो लाखो शिवसैनिक मातोश्रीवर होते. कशाला भीती वाटते का मातोश्रीला? काय घेऊन जातील म्हणून भीती वाटते. सैनिकच जमा होते. काय केलं? मुख्यमंत्री आले. महिला छाती पिटत होत्या. मला काही कळलंच नाही. काय झालं काय मातोश्रीत. काय शो आहे… याला राज्य चालवणं म्हणतात का? असा सवालही त्यांनी केला.