मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनी ‘No Holds Barred’ नावाचं आत्मचरित्र लिहून, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. या आत्मचरित्रातून नारायण राणे यांनी आपला व्यक्तिगत आणि राजकीय जीवनप्रवास मांडला आहे. 192 पानांच्या या आत्मचरित्रातील ‘पान क्रमांक 81’ चीच सर्वाधिक चर्चा सध्या महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात रंगू लागली आहे. कारण या पानावरुन नारायण राणेंनी मोठा राजकीय गौप्यस्फोट केला आहे.
आत्मचरित्र हे आपल्या जीवनात काय घडलं? हे सांगणारं एक प्रकारचं माध्यमच आहे. पण कधी कधी आत्मचरित्र हे गौप्यस्फोट किंवा खळबळ उडवून देण्याचंही काम करतात आणि असंच काहीसं नारायण राणेंनी ‘नो होल्डर्स् बार’ या आत्मचरित्रातून केलं आहे. अनेक खळबळजनक दावे आणि गौप्यस्फोट नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रातून केले आहेत. अर्थात त्यांच्या टार्गेटवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आहेत.
नारायण राणेंच्या आत्मचरित्राचं सुरुवातच ‘जर्नी टू नारायण राव’ अशी आहे. एकूण 12 प्रकरणांमधून गौप्यस्फोट, दावे आणि आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वार शिवसेनेवर आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे, हेही फार इंटरेस्टिंग आहे.
नारायण राणेंच्या या आत्मचरित्रातील ‘पान क्रमांक 81’ची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पानावरुन त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.
‘पान क्रमांक 81’ वर काय आहे?
“14 एप्रिल 2005 रोजी रवींद्र नाट्य मंदिरात पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मी ‘नवीन बॉस’च्या चुकीच्या पद्धती शिवसैनिकांसमोर मांडल्या. त्यानंतर अर्थातच उद्धवजींनी मला पक्षातून काढण्याची मागणी केली. 2005 मध्ये मी आणि नीलम अतिशय व्यथित झालो. ज्या दिवशी मी राजीनामा दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी मला
फोन करुन रांग शांत झाला का? अशी विचारणा केली. आणि राजीनाम्याचा पुनर्विचार करण्यासही सांगितलं. मात्र माझ्या काही निष्ठावान शिवसैनिकांकडून कळलं की बाळासाहेबांनी असा फोन केल्याचं कळताच उद्धवजी बाळासाहेबांकडे गेले.
आणि नारायण राणेंना परत पक्षात घेतल्यास मी आणि रश्मी मातोश्री सोडून जाऊ. अशी धमकी बाळासाहेबांना दिली.”
पान क्रमांक 81 जसंच्या तसं :
पुस्तकात इतर गौप्यस्फोट काय?
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर एकप्रकारे तिक्ष्ण प्रहार केलेत. 2002 मध्ये आघाडी सरकार पाडण्याचा प्लॅन फसला, असा दावाही राणेंनी केला. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यातला एक प्रयत्न 2002 साली झाला. 2002 मध्ये दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंसह उद्धव ठाकरेंनी आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.
नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरेंबद्दलही गौप्यस्फोट केला आहे. “2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर काही दिवसांनी राज ठाकरे माझ्याकडे आले. उद्धव ठाकरेंमुळं आपण त्रासलो असून नवा पक्ष स्थापन करु”, असा प्रस्ताव राज ठाकरेंनी माझ्यासमोर ठेवला. मात्र, “राज ठाकरेंबरोबर मी काम केलेलं आहे. त्यांची कामाची पद्धत मला माहित आहे, त्यामुळे पुन्हा ठाकरेंसोबत काम करु शकत नाही.” असेही राणेंनी आत्मचरित्रात म्हटले आहे.