‘त्‍याने आता मर्यादा ओलांडली; आपली औकात ओळखावी’, राणेंचा जरागेंवर घणाघात

| Updated on: Feb 14, 2024 | 6:03 PM

मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असं वक्तव्य केल्यामुळे नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी मनोज जरांगे यांना प्रतिआव्हान दिलं आहे.

त्‍याने आता मर्यादा ओलांडली; आपली औकात ओळखावी, राणेंचा जरागेंवर घणाघात
Follow us on

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावर भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. नारायण राणे यांनी ट्विटरवर भूमिका मांडली आहे. त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांना जागेवरुन हलवून दाखव, असं प्रतिआव्हानच नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. नारायण राणे यांच्या टीकेला आता मनोज जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

“मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही, अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले होते?

“महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही”, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. “नुसतं नाटकं सुरु आहेत. तुम्हाला मराठे सोपे वाटतात का?” असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे. “काय नुसतं चाललं आहे, मजा चालली आहे. तुम्हाला मराठ्यांना खेटायचंय? बेसावध राहू नका. महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधानांच्या सभा होऊ देणार नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.