मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : राज्यातील 511 ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचं आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. त्यांनी कौशल विकासच्या माध्यमातून तरुणांना नव्या स्वप्नांचं जग दाखवलं. कौशल्य विकास केंद्रांमधून प्रशिक्षण घेऊन तरुण जगभरातील अनेक देशांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतात, असं मोदींनी सांगितलं.
“प्रत्येक आईची इच्छा असते की, तिच्या मुलांना सुख, समृद्धी, यश मिळो. सुख आणि यशाची प्राप्त ही शिक्षण आणि कौशल्यानेच शक्य आहे. महाराष्ट्राच्या मुलं आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास केंद्रांचं शुभारंभ होत आहे. कौशल्य विकासच्या मार्गावर पुढे जाण्याचा संकल्प करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, आजची प्रभात मंगल प्रभात झालीय. महाराष्ट्रात 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना होत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
“संपूर्ण जगात आज भारताच्या कौशल्यवान तरुणांची मागणी वाढत आहे. अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. तिथे वृद्धांची संख्या वाढत आहे आणि कौशल्यवान युवक खूप कमी प्रमाणात मिळत आहेत. सर्व्हे सांगतोय की, जगातील 16 देश जवळपास 40 लाख कौशल्यवान तरुणांना आपल्या देशात नोकरी देऊ इच्छूक आहेत. या देशांमध्ये कौशल्यवान तरुणांची संख्या कमी असल्याने हे देश दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे”, असं मोदींनी सांगितलं.
“बांधकाम क्षेत्र, आरोग्य विभाग, पर्यटन विभाग, शिक्षण विभाग आणि ट्रान्सपोर्ट सारखे अनेक सेक्टर आहेत, जिथे आज विदेशात खूप डिमांड आहे. त्यामुळे भारत आज फक्त देशासाठी नाही तर जगासाठी कौशल्यवान तरुण तयार करत आहे. महाराष्ट्रात 511 कौशल्य विकास केंद्र सुरु होत आहेत. हे केंद्र सुद्धा महाराष्ट्रातील तरुणांना जगभरातील संधी उपलब्ध करुन देण्याचं काम करणार आहेत”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“या केंद्रांमध्ये बांधकाम क्षेत्राशी संबंधित कौशल्य शिकवलं जाईल, आधुनिक पद्धतीने शेती कशी करायची याबाबतचं कौशल्य शिकवलं जाईल, महाराष्ट्रात मीडिया आणि मनोरंजनाचं खूप मोठं काम आहे. यासाठी देखील स्पेशल ट्रेनिंग देणारे अनेक केंद्र स्थापन होतील. भारत आज इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरचा खूप मोठा हब बनत आहे. महाराष्ट्राच्या तरुणांना कौशल विकास केंद्राच्या निमित्ताने खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देतो”, असंही मोदी म्हणाले.
“मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, तरुणांना सॉफ्ट ट्रेनिंगची देखील संधी द्या. आपल्या तरुणांना विदेशात नोकरीची संधी मिळत असेल तर सामान्य व्यवहाराच्या गोष्टी शिकवाव्यात. तरुणांना भाषा शिकवाव्यात. अशा कुशल तरुणांना विदेशी कंपन्यादेखील लवकर कामावर रुजू करुन घेतात. त्यामुळे सॉफ्ट स्किलसाठीदेखील ऑनलाईन मॉड्यूल डेव्हलोप करा”, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.