मुंबई : “महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवल्या पाहिजेत ही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका रास्तच आहे. पटोले यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे. माझा या भूमिकाला पाठिंबा आहे,” असं मत माजी मंत्री आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी व्यक्त केलं आहे (Naseem Khan demand independent Assmebly election for congress).
नसीम खान म्हणाले, “काँग्रेस पक्ष सर्वात जुना पक्ष आहे. याआधी तो राज्यातही नंबर एकचा पक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता आणलेली आहे. काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात आजही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. स्वबळावर निवडणुका लढल्यास पक्ष संघटनाही मजबूत होण्यास मदत होईल. राज्यातील पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावरच लढवाव्यात ही भूमिका रास्त आहे.”
“काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवल्यास त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. काँग्रेसला राज्यात गतवैभव प्राप्त करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याची घेतलेली भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे,” असंही नसीम खान म्हणाले.
Naseem Khan demand independent Assmebly election for congress