मुंबई: तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई-ठाण्यासह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि काँग्रेसचे कोकणातील प्रभारी नसीम खान यांनी केली आहे. नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. (naseem khan demands compensation for cyclone affected farmers in maharashtra)
तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. या वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना देऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी खान यांनी केली आहे.
आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त
गेल्या दोन दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला जोरदार फटका बसला आहे. तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा व केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. घरांचे पत्रे उडून गेले आहेत तर अनेक घरांच्या भिंती पडून मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचा मुख्य स्रोत असलेल्या आंबा व केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे तसेच मच्छिमारांच्या बोटींचेही नुकसान झाल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनामुळे आधीच संकटाचा सामना करत असलेल्या जनतेला या तौक्ते वादळाचा फटका बसून मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करुन लवकर नुकसान भरपाई देऊन लोकांना दिलासा द्यावा, असे त्यांनी म्हटलं आहे.
12 हजार 420 नागरिकांचं स्थलांतर
दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणयात आलंय. तीन जिल्ह्यात मिळून एकूण 12 हजार 420 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.
उरणमध्ये 2 महिलांचा मृत्यू
उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर 800 पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (naseem khan demands compensation for cyclone affected farmers in maharashtra)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 17 May 2021 https://t.co/pMmW2GGGNq #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
संबंधित बातम्या:
Cyclone in Maharashtra : सिंधुदुर्गला सर्वाधिक फटका, रस्ते बंद, बत्ती गुल, नेटवर्क गायब!
(naseem khan demands compensation for cyclone affected farmers in maharashtra)