मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हनुमान चालिसा (hanuman chalisa) पठनाचं आंदोलन हाती घेतलं. हे आंदोलन हाती घेताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच ललकारलं. मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह राणा यांनी धरला. त्यानंतर शिवसैनिकांचं आंदोलन, राणा दाम्पत्यांची अटक आणि सुटकेचं नाट्य घडलं. हनुमान चालिसाची मोहीम हाती घेतल्यापासून राणा दाम्पत्यांमागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. एका घटनेमुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक नव्हे तर तीन तीन प्रकरणे राणा यांच्या मागे लागले आहेत. त्यांचं रुग्णालयातील अॅडमिट होणंही वादात सापडलं आहे. त्यांच्या घरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दाही बाहेर आला आहे. तसेच त्यांनी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेमुळे त्यांचा जामीनही धोक्यात आला आहे. या तीन प्रकरणांमुळे राणा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या उलट नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र, त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
नवनीत राणा यांना कोर्टाने जामीन दिल्यानंतर उपचारासाठी त्या लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. स्पॉन्डिलायसिस आणि लोअर वेस्टमध्ये त्रास असल्याची तक्रार त्यांनी केली होती. लिलावतीत त्यांची एमआरआय टेस्ट झाली. पण ही टेस्ट करतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे त्या आणखीनच अडचणीत आल्या. एमआरआय कक्षात धातुच्या वस्तू नेल्या जात नाहीत. पेशंट शिवाय तिथे कुणी नसतं. मग फोटोग्राफर गेलाच कसा? फोटो व्हायरल केलेच कसे? असा सवाल शिवसेनेने केला. शिवसेना केवळ सवाल करून थांबली नाही. तर शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी थेट लिलावती गाठत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. लिलावती रुग्णालयाचे नियम कडक असतात. रुग्णालयात फोटो काढण्यास मज्जाव आहे. एमआरआय कक्षात कुणालाही धातूच्या वस्तू घेऊन जाता येत नाही. असं असताना एमआरआय कक्षात जाऊन व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी होणं चुकीचं आहे. त्याविरोधात आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत, असं कायंदे यांनी सांगितलं. त्यामुळे नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हनुमान चालिसा प्रकरणामध्ये अटक झाल्यानंतर राणा दाम्पत्यांना लवकर जामीन मिळाला नाही. त्यामुळे त्यांना 14 दिवस तुरुंगात राहावं लागलं. याच दरम्यान, राणा यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम असल्याच्या संशयावरून मुंबई महापालिकेने त्यांना नोटीस बजावली. खार येथील राणा दाम्पत्यांच्या घरी जाऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. त्यानंतर आज पुन्हा पालिकेचे अधिकारी राणा दाम्पत्यांच्या घरी गेले. मात्र, आजही राणा दाम्पत्य घरी नव्हते. त्यामुळे आता पुन्हा एकदा राणा यांना नोटीस बजावल्या जाणार आहे. त्यावर राणा दाम्पत्याचं म्हणणं ऐकून पालिका अहवाल तयार करून त्यांच्या घरावर कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहे.
नवनीत राणा यांना काही अटी व शर्तींवर जामीन देण्यात आला होता. त्यात मीडियाशी संवाद साधण्यास राणा यांना मनाई केली होती. गुन्ह्याशी संबंधित गोष्टीबाबत मीडियाशी संवाद साधल्यास जामीन रद्द होईल असं कोर्टानं म्हटलं होतं. रुग्णालयातून डिस्चार्ज मिंळाल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा ललकारले. तसेच पोलिसांनी चांगली वागणूक दिली नसल्याचंही म्हटलं. त्याला सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आक्षेप घेतला आहे. कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा करत घरत यांनी राणा यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टाने तुमचा जामीन रद्द का करू नये, असं सांगत राणा यांना 18 मे पर्यंत म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत.