मुंबई: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत प्रचंड मोर्चा काढला. सरकारचा आणि खासकरून भाजप नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चा निमित्ताने सत्तांतरानंतर पाहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकाच मंचावर दिसले. या मोर्चाला मोठी गर्दी जमवण्यात आघाडीला यश आलं. पण या गर्दीवरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चाचा सांगितलेला आकडा एक आहे, पोलिसांनी सांगितलेला वेगळा तर खासदार नवनीत राणा यांनी सांगितलेला आकडा वेगळाच आहे. त्यामुळे मोर्चाचा आकडा नेमका काय? असा सवाल केला जात आहे.
महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चाला 65 हजार लोक उपस्थित होते असा पोलिसांचा दावा आहे. पण पोलिसांचा हा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोडून काढला आहे.
मोर्चात प्रत्यक्ष सहभागी लोकं 2 लाखांच्यावर. मात्र देवेंद्रजी यांच्या आदेशावरून पोलिसांनी काढलेली आकडेवारी 65 हजार… नाही उद्विग्न व्हावं माणसांनी पण इतकंही नाही… असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्विटमधून लगावला आहे. मिटकरी यांच्या मते कालच्या मोर्चाला 2 लाखाहून अधिक लोक उपस्थित होती.
तर खासदार नवनीत राणा यांनी मोर्चाचा आकडा वेगळाच सांगितला आहे. मोर्चाला फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते. हा नौटंकी मोर्चा असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे. महाविकास आघाडी कडून काढण्यात आलेला महामोर्चा नसून हे नौटंकी मोर्चा आहे. ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं, अशी टीकाही राणा यांनी केली आहे.
हनुमान चालीसा वाचणे म्हणजे देशद्रोह ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी नोंद ठाकरे सरकारच्या काळात झाली आहे. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे संविधानावर चालणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नाटक कंपनीकडून संत आणि देवांना घेऊन जे नाटक सुरू आहे ते ठाकरेंनी बंद केले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
मोर्चा पूर्णपणे फसला आणि फेल गेला आहे. मोर्चाला जी गर्दी झाली ती पैसे देऊन झाली होती. उद्धव ठाकरे आपण जे भाषण केले ही आमची ताकद आहे. आपण जे गार्दी आणली ती पण पैसे देऊन आणली. झाकली मूठ सव्वा लाखाची. या मोर्चाच्या माध्यमातून सत्य उघड झालं आहे, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.