मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत एनसीबीच्या धाडी आणि ड्रग्ज प्रकरणावर चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. त्यामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवाब मलिक यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एनसीबीचं धाडसत्रं आणि ड्रग्ज प्रकरणावर चर्चा करून त्यांच्यासमोर काही तथ्य ठेवले. त्यानंतर मलिक यांनी मीडियाशी संवाद साधून भेटीबाबतचा तपशील दिला. परभणी नांदेडच्या दौऱ्यावर असताना ज्या काही घडामोडी झाल्या. एका पंचाने सर्व प्रकार समोर आणले. मी आरोप करत होतो त्यात भर घालणाऱ्या या गोष्टी होत्या. आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणाची एसआयटीची चौकशी लावण्याची मागणी केली आहे, असं मलिक म्हणाले.
या प्रकरणात अनेक लोकांनी तक्रार केल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. तपास करून निश्चित रुपाने त्यावर गुन्हा दाखल करून त्यावर कारवाई होईल असं आश्वासन मला दिलेलं आहे. एकदा एफआयआर झाल्यानंतर गोसावी सारखे लोकं कसे पैसै उकळतात किंवा कसे लोकांना हँडल करतात हे तपासातून बाहेर येईल, याचा मला विश्वास आहे. एकदा एफआयर झाला की सर्व गोष्टी बाहेर येईतील, असंही त्यांनी सांगितलं.
समीर वानखेडेंवर एफआयआर दाखल होणार का? असा थेट सवाल मलिक यांना करण्यात आला. त्यावर मलिक यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. एफआयआर घटनेबाबत होईल. खंडणी वसूल करणे, पंच फरार असताना आरोपींना हँडल करणे, कोऱ्या कागदावर सह्या घेणे आदी गोष्टींचा तपास होईल आणि त्यानंतर पोलीस एफआयर दाखर करतील. एफआयआर व्यक्ती विरोधात होणार नाही. घटनेचा असेल. तपासात जेजे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. कुणाला सूडबुद्धीने अडकवायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवर निर्णय घेऊन एसआयटी नेमावी की आणखी काय करायचं याचा निर्णय क्राईम ब्रँच घेईल, असं आश्वासनही देण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हॉलिवूडनंतर बॉलिवूड मोठी इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीला बदनाम केलं जात आहे. पाच दहा जणांवर गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
(Nawab Malik met cm uddhav thackeray and demand SIT probe after NCB witness makes allegations regarding ‘pay off’)