निवृत्ती बाबर, Tv9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आलाय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या देवगिरी निवासस्थानी दाखल झाले. या भेटीचं कारण सुरुवातीला समजू शकलं नव्हतं. नवाब मलिक यांच्याआधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. त्यामुळे या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची देवगिरी बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचीदेखील माहिती समोर आली होती. त्यामुळे ही बैठकदेखील देवगिरी बंगल्यावर सुरु असल्याची चर्चा आहे. या बैठकीसाठी नवाब मलिक अजित पवारांच्या निवासस्थानी आले असावेत, अशीदेखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण आता अजित पवार आणि नवाब मलिक यांच्या भेटीबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे.
मतदारसंघातील कामे होत नसल्यामुळे आज नवाब मलिक आणि त्यांच्या कन्या सना मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत मलिक आणि अजित पवार यांच्यात 1 तास चर्चा झाली. मतदारसंघातील नागरिकांची अनेक प्रलंबित कामे आहेत. याबाबतचे प्राप्त निवेदने अजित पवार यांना दोघांच्या वतीने देण्यात आली. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून देखील कामे होत नसल्यामुळे नवाब मलिकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवाब मलिक वर्षभरापासून जास्त काळ जेलमध्ये होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना अटक केली आहे. मलिक जेलमध्ये आजारी पडले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना कोर्टाकडून जामीन देण्यात आला. त्यानंतर नवाब मलिक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरच्या विधान भवन परिसरात दिसले होते. त्यावेळी नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जातील, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी अजित पवार गटाच्या आमदारांच्या बाकावर बसले होते. तसेच ते विधान भवनात अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले होते. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची जोरदार चर्चा झाली. पण यानंतर वेगळ्या घडामोडी घडल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिकांच्या मुद्द्यावरुन थेट पत्र लिहिलं. देशद्रोहाचा आरोप असलेल्यांना महायुतीत घेतलं जाऊ नये, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात मांडली. तसेच नवाब मलिक यांच्याबाबतच्या भूमिकेमुळे महायुतीत वितुष्ट येईल असा निर्णय घेऊ नये, असंही आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्राद्वारे केलं होतं. फडणवीसांनी आपलं हे पत्र सोशल मीडियावरही शेअर केलं होतं. त्यामुळे या पत्राची जोरदार चर्चा झाली होती.
देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रानंतर अजित पवारही बॅकफूटवर आले होते. त्यांनी नवाब मलिक यांनी फक्त आपली भेट घेतल्याचं म्हटलं होतं. तसेच त्यांनी नवाब मलिक यांना पक्षात सहभागी करुन घेण्याबाबत कोणतंही स्पष्ट मत मांडलं नव्हतं. पण त्यानंतर आता नवाब मलिक अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे आज आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे. जितक्या जागा शिंदे गटाला देणार, तितक्याच जागा आम्हाला द्या, अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. लोकसभेसाठी समसमान जागावाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, असं स्वत: अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट म्हटलं आहे.