मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. वानखेडे यांना नुसतं हटवलं नाही तर वानखेडेंकडून इतर पाच केसेसही काढून घेतल्या आहेत. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात झालेल्या चुकांमुळेच समीर वानखेडेंची पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. नेमक्या या पाच चुका काय आहेत? त्याचाच घेतलेला हा आढावा.
मुंबई क्रुझवर छापेमारी करण्यात आली. तेव्हा क्रुझवरील लोकांना बाहेरच्या लोकांनी ताब्यात घेतलं. आर्यन खानला तर केपी गोसावी घेऊन जाताना दिसत होता. ज्यांचा एनसीबीशी काहीच संबंध नाही अशा लोकांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला गेला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नेमका हाच पॉइंट वारंवार मांडून समीर वानखेडे आणि एनसीबीला अडचणीत आणलं.
या कारवाईवर नवाब मलिक यांनी आणखी एक सवाल केला होता. एनसीबीने क्रुझवरील पार्टीवर कारवाई केली. ड्रग्ज पकडल्याचं सांगितलं. मग पंचनामा क्रुझवर का केला नाही? एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा का केला? असा सवाल मलिक यांनी केला होता. एनसीबीने क्रुझऐवजी एनसीबीच्या कार्यालयात पंचनामा केल्याचे फोटोच त्यांनी व्हायरल केले होते. समीर वानखेडेंच्या टेबलवरील सीजर पासून ते कार्यालयातील पडदे या फोटोत दिसत असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. कायद्यानुसार कोणताही पंचनामा घटनास्थळी करणे बंधनकारक आहे. मात्र, इथे घटनास्थळाऐवजी एनसीबीने त्यांच्या कार्यालयात पंचनामा केल्याचं दिसून आलं. ही वानखेडेंची घोडचूक असल्याचं सांगण्यात येतं.
या प्रकरणात फ्लेचर पटेल, प्रभाकर साईल आणि केपी गोसावी हे पंच होते. हे पंच वानखेडेंच्या ओळखीचे होते. तसेच एनसीबीच्या कारवायांमधील दोनपेक्षा अधिक प्रकरणातही हेच लोक पंच होते. त्यामुळे वारंवार तेच पंच घेण्यामागचं कारण काय? असा सवाल करत मलिक यांनी हे एक मोठं रॅकेट असल्याचा दावा केला होता. मलिक यांचा हा दावा एनसीबीला खोडून काढता आला नाही. शिवाय फरार आरोपी असलेला गोसावी हा पंच कसा झाला? फरार आरोपी कोणत्या कायद्याने पंच होऊ शकतो? असा सवालही मलिक यांनी केला होता. त्याचंही उत्तर एनसीबीला देता आलं नाही. तसेच फ्लेचर पटेलचे वानखेडेंच्या बहिणीसोबतचे फोटोही मलिक यांनी व्हायरल केले. घरगुती संबंध असलेल्या व्यक्तीला वानखेडे पंच म्हणून कसे काय नेमू शकतात? असा सवालही त्यांनी केला होता. त्यामुळे वानखेडेंभोवतीचा संशय वाढला होता.
मलिक यांनी एनसीबीवर अनेक आरोप केले. त्याची उत्तरे एनसीबीकडून देता आली नाही. मात्र, मलिक यांच्या जावयावर कारवाई केल्यानेच हे आरोप होत असल्याचा दावा भाजपने करून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रभाकर साईल हा साक्षीदार फुटल्यानंतर मात्र, भाजपची बोलती बंद झाली. आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा दावा साईल यांनी केला. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण खंडणीचं असल्याच्या मलिक यांच्या दाव्याला बळ मिळालं. त्यानंतरही एनसीबीने वानखेडेंची चौकशी केली नाही. ही एनसीबीची घोडचूक झाली.
या प्रकरणात सर्वाधिक खळबळ उडाली ती एका लेटर बॉम्बने. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील आणि नवाब मलिक यांना या अधिकाऱ्याने पत्रं लिहून मोठा गौप्यस्फोट केला होता. या पत्रात एकूण 26 प्रकरणावर भाष्य करण्यात आलं होतं. या 26 प्रकरणात बोगस कारवाई झाल्याचं सांगत वानखेडे यांची कार्यशैली आणि खंडणीखोरीवरही प्रकाश टाकला होता. त्यानंतर एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयातून सूत्रे हलली आणि वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली.
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | November 2021https://t.co/OrsLGmYQC8#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2021
संबंधित बातम्या:
Aryan Khan drugs case | ”आरोप झाले मग त्या अधिकाऱ्याला बदलायचं हा वाईट मेसेज जाणार”
आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंग यांच्याकडे, कोण आहेत संजय सिंग?
(ncb has done 5 mistakes in aryan khan drugs case)