मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी खेळी केली. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ 2 जुलैला घेतली. मात्र 2 दिवसांआधीच म्हणजे 30 जूनला अजित पवारांनी राष्ट्रवादीवर दावा केला. तशी याचिकाच अजित पवार गटाकडून निवडूक आयोगात करण्यात आली. त्यामुळे आता पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरु झालीय.
अजित पवारांनी 30 जूनलाच राष्ट्रवादीच्या चिन्हावर दावा केला. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार असे एकूण 40 जणांची प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली. अजित पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष असा ठराव आमदार, खासदारांनी पास केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 3 जुलैला जयंत पाटलांनीही निवडणूक आयोगाकडे कॅव्हिएट दाखल केली. कॅव्हिएटचा अर्थ असाच आहे की, निर्णय घेण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल.
अजित पवारांसह 9 मंत्र्यांच्या अपात्रतेबद्दल जे पत्र विधानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आलं, त्याची प्रतही आयोगाला देण्यात आलीय. मात्र पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही आणि चिन्हं गेलं तरी चिंता नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीलाही आव्हान देण्यात आलं आहे. प्रेस नोट काढून अजित पवार गटानं राष्ट्रवादीत बेकायदेशीर निवड झाल्याचं म्हटलंय.
24 तासांच्याआधी पर्यंत अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असल्याचं म्हणत होते. मात्र 30 तारखेलाच अजित पवारांचीच अध्यक्ष म्हणून निवड झालेली प्रतिज्ञापत्र आयोगाला देण्यात आलीय. विशेष म्हणजे अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत खासदार सुनिल तटकरेंनीही अजित पवारांचा उल्लेख राष्ट्रीय नेते असा केला.
शपथविधी आधीच, अजित पवारांनी आमदार खासदारांचं समर्थनच मिळवलं नाही. तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतली. म्हणजेच, अभ्यासपूर्ण खेळी अजित पवार गटानं केली, ज्याचा उल्लेख अजित पवार कॅम्पच्या छगन भुजबळांनी केलाय.
अजित पवार आणि शरद पवार, दोन्ही काका पुतण्यांकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली. अजित पवारांच्या बैठकीत 32 आमदार तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार हजर राहिले. राष्ट्रवादीचे एकूण आमदार 53 आहेत. मात्र 5 आमदार दोन्ही बैठकीला हजर राहिले नाहीत. पण भुजबळांनी अजित पवार गटाकडे 40 आमदार असल्याचा दावा केलाय.
एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेना फुटली. तो संघर्ष उद्धव ठाकरे आणि शिंदेंमध्ये सुरु आहे. तशीच पक्ष आणि चिन्हाची लढाई, पवार काका-पुतण्यांमध्ये सुरु झालीय.