पक्ष वेगळे, राजकीय उलथापालथी, पण एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण

| Updated on: Jun 16, 2023 | 12:07 AM

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच रेल्वे गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पक्ष वेगळे, राजकीय उलथापालथी, पण एकाच रेल्वे डब्यातून प्रवास, चर्चांना उधाण
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकाच ट्रेनने प्रवास केला आहे. दोन्ही नेते राजधानी एक्सप्रेसने जळगावला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते एकाच रेल्वे डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटो समोर आले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण ही भेट ठरवून झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हा एक योगायोग असल्याचं गुलाबराव पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

शरद पवार हे राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या कार्यक्रम निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर मंत्री गुलाबराव पाटील हे कॅबिनेटची बैठक आटोपून जळगावला रवाना झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकाच ट्रेनने प्रवास केल्याचं समोर आलं आहे.

गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

गुलाबराव पाटील यांनी शरद पवार यांच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. “हा योगायोग आहे. त्यांचा आणि माझा रेल्वे प्रवास आजूबाजूला होता. त्यांच्यासोबत प्रवास करण्याची संधी मिळाली आणि चर्चा करण्यास मिळाला. विकास कामाबाबत चर्चा झाली. आनंद वाटला”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शरद पवार यांचं जळगावमध्ये जंगी स्वागत

दरम्यान, शरद पवार यांचं जळगावात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थित उद्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादी ग्रंथालय सेलचं शिबीर पार पडणार आहे. या शिबिरासाठी पवार जळगावात दाखल झाले आहेत. जळगावातील जैन हिल्स येथे त्यांचा मुक्काम असणार आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांच्या रेल्वे डब्यात अशाप्रकारच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. अनेक राजकीय उलथापालथ बघायला मिळाल्या. त्यामुळे राजकारणात कोण कुणासोबत जाईल, याचा काहीच भरोसा नाही, असं सर्वसामान्यांना वाटू लागलेलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत 40 आमदारांसोबत बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून राज्यात शिंदे गट आणि भाजपचं सरकार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी देखील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला देखील याचा मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप बंड पुकारलेल्या आमदारांनी केला होता. त्यामुळे गुलाबराव पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कविर्तक लढवले जात आहेत.