मुंबई | 26 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांची गेल्या आठवड्यात अहमदाबाद येथे भेट झाल्याची माहिती समोर आलेली. शरद पवार आणि गौतम अदानी एकत्रितपणे एका कारखान्याचं उद्घाटन करत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला. संबंधित फोटो समोर आल्यानंतर अगदी महाराष्ट्रातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतच राजकारण तापलं होतं. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. तसेच इंडिया आघाडीतही खळबळ उडाल्याची चर्चा होती. अखेर या भेटीवर शरद पवार यांनी मौन सोडलं आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी गौतम अदानी यांच्यासोबतच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं.
“मी अहमदाबादला गेलो होतो, ही बातमी खरी आहे. अहमदाबाद जवळ एक इंडस्ट्रीयल इस्टेट आहे. तिथे बारामतीच्या एका शेतकऱ्याने उद्योग उभा केला. मी त्या उद्योगाचं उद्घाटन केलं. खरंतर तो एक छोटा कारखाना आहे. गाय जेव्हा वासरुला जन्म देते तेव्हा पहिल्या दोन दिवसात जे दूध असतं, त्याला आपण चीक म्हणतो”, असं शरद पवार म्हणाले.
“त्या दुधापासून शेतकरी कुटुंबाच्या व्यक्तीने दहा वर्ष अभ्यास करुन एक प्रोडक्ट निर्माण केलं. ते प्रोडक्ट दोन-तीन महिने दररोज सकाळी चहात टाकून घेतलं तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. या प्रोडक्टचा कारखाना त्यांनी तयार केला. मला त्यांनी या कारखान्यांच्या उद्घाटनाला येण्याची विनंती केली”, असं शरद पवार यांनी सांगितलं.
“बारामतीच्या एका खेड्याच्या शेतकऱ्याने अशाप्रकारचं देशात कुठेही मिळत नाही असं प्रोडक्ट तयार केलं, मला असं वाटलं की त्या व्यक्तीला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्या कार्यक्रमाला गौतम अदानी यांना त्यांनी अध्यक्ष म्हणून बोलावलं होतं. तर मला उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. त्यामुळे मी आनंदाने गेलो. कारखान्याचं उद्घाटन केलं आणि त्या शेतकऱ्याला शाबासकी दिली. असं कुणाकडूनही होत असेल तर मी आनंदाने उद्घाटनाला जाईन”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.