महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, शरद पवार यांची भूमिका काय?

| Updated on: Jul 02, 2023 | 2:23 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आता सत्तेत सामील होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हे देखील राजभवनावर शपथविधीसाठी दाखल झाले आहेत.

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, शरद पवार यांची भूमिका काय?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आता सरकारमध्ये सामील होणार आहेत. अजित पवार हे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आता अजित पवार हे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असतील. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील राजभवनावर दाखल झाले आहेत. ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्या राजभवनातील फोटो समोर आला आहे. तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हे देखील राजभवनावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं सध्या तरी चित्र आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक दिग्गज नेते राजभवनात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे सुद्धा राजभवानवर दाखल आहेत. अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

अमित शाह यांच्या महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्रात विधानसभेच्या 145 जागा हव्या असतील तर अजित पवार आपल्यासोबत हवेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश दिले आहेत. आजच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. दिल्लीत प्रचंड खलबतं घडले आहेत. त्यानंतर आजचा राजकीय भूकंप घडून आल्याचं चित्र आहे.

अनेक दिवसांपासून होती चर्चा

अजित पवार हे गेल्या महिन्यात अचानक नॉटरिचेबल झाल्याची बातमी समोर आली होती. जवळपास सलग तीन ते चार दिवस याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार भाजपसोबत जातील, अशी चर्चा होती. शरद पवार यांनी या चर्चांचं खंडन केलं होतं. तसेच अजित पवार यांनीदेखील नंतर माध्यमांसमोर येत या चर्चा चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं.