मुंबई : महाराष्ट्राचं राजकारण आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याभोवती केंद्रीत झालं. कारण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विदेश दौऱ्यावर गेले असताना त्यांनी आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास पेक्षा जास्त वेळ चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया न देता निघून गेले. विशेष म्हणजे त्यानंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. कारण उद्योगपती गौतमी अदानी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे या दोन भेटींचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला. अखेर या दोन्ही भेटींमागील कारण शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
गौतम अदानी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गौतमी अदानी यांच्यासोबतच्या भेटीचं कारण सांगितलं. “सिंगापूरचे काही लोक माझ्याकडे आले होते. काही तांत्रिक मुद्द्यांवर त्यांना उद्योजक गौतम अदानी यांची भेट घ्यायची होती. गौतम अदानी आणि सिंगापूरच्या शिष्टमंडळाची भेट झाली. तो तांत्रिक विषय आहे. मला त्यातलं जास्त काही समजत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात उल्हासनगरमध्ये गुन्हा दाखल झालाय. याच गुन्ह्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्याला आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला, याबाबत कल्पना नसल्याचं सांगितलं. तसेच जितेंद्र आव्हाड आणि आपली भेट झालेली नाही. या विषयी उद्या माहिती घेणार, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
दरम्यान, शरद पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचं स्पष्टीकरण दिलं. “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली”, असं शरद पवार यांनी ट्विटरवर सांगितलं.
मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय… pic.twitter.com/Q6dSxeUMLR
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 1, 2023
“यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.