मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या देशातील विविध घटनांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.
‘सगळ्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. त्याबाबत मलाही त्यांनी माहिती दिली होती. त्यांच्या आरोपामुळे वातावरण तयार झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आरोप करणारे कुठे आहेत त्याचा आज पत्ता नाही. जबाबदार अधिकारी बेछुटपणे आरोप करतो हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला. ते बाजूला झाले आणि हे गृहस्त गायब झाले. हा फरक आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“आता अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. मला कौतुक वाटतं त्या एजन्सीचं. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा”, अशा शब्दात पवारांनी निशाणा साधला.
देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी
25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.
6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.
अनिल देशमुख यांच्या घर-कार्यालयांवर आता आयकर विभागाने धाडी टाकल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले.
“उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत. लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आलं. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते. ते नाकारलं गेलं. पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करावी लागली आणि हे सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर घडलं”, असं शरद पवार म्हणाले.
“अपेक्षा अशी होती की शेतकऱ्यांची हत्या झाली, जरी सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आरोप झाला तरी सत्ताधारी पक्षानं काही भूमिका घ्यावी. पण सत्ताधारी पक्षाकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली गेली. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना आपल्या पदावरुन मुक्त व्हावं. आज त्याची गरज आहे. जेणेकरुन कायदा-सुव्यवस्था, यंत्रणेवर लोकांचा विश्वास राहील”, असंदेखील पवार म्हणाले.
“लखीमपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी विचारलं की मावळमध्ये काय घडलं. त्यांनी विचारलं ते फार बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडेल. पण त्यांच्या मृत्यूला जबाबदार नेते नव्हते. आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काही पाऊल उचललं. मावळच्या शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला त्याबाबत लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी होती. तीच स्थिती आज लखीमपूरमध्ये आहे. मावळमधील आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्तिथी कळाली. या तालुक्यात सातत्यानं जनसंघ आणि नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते”, अशी भूमिका पवारांनी मांडली.
हेही वाचा : फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच माडंली!