‘कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भत नाही’, असं का म्हणाले शरद पवार?

| Updated on: May 05, 2023 | 6:47 PM

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. पण यामध्ये अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. पत्रकारांनी यावेळी अजित पवार यांच्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

कुणी जात असेल तर थांबवण्याचा प्रश्न उद्भत नाही, असं का म्हणाले शरद पवार?
Ajit pawar and Sharad Pawar
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सारं काही आलबेल नाही अशाच बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. तर इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी निर्णयाला विरोध केला. कार्यकर्ते आणि इतर नेत्यांचा सूर पाहता नंतर अजित पवार यांनीही शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत अशी भूमिका घेतली. पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्याबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवार अचानक नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या तीन आठवड्यांपूर्वी समोर आलेली. या चर्चांनंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार एका कार्यक्रमात हजर होते. आपल्याला पित्ताचा त्रास होत असल्याने आधीच्या दिवसांचे कार्यक्रम रद्द केल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पण राजकीय वर्तुळात अजित पवार दिल्लीला बैठकीसाठी गेल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. याबाबतच्या चर्चा वाढल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर सर्व दावे फेटाळले होते.

या सगळ्या घडामोडींनंतर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड खळबळ उडाली. कार्यकर्त्यांनी प्रचंड आंदोलन केलं. त्यानंतर शरद पवार यांनी आज आपण राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं.

हे सुद्धा वाचा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

यावेळी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांनी अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका, असं उत्तर दिलं. यावेळी पत्रकारांनी पक्षातील काही नेते दुसऱ्या पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चांबद्दल प्रश्न विचारले. त्यावर शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

“बात अशी आहे की, कुणाला जायचं असेल, मग तो कोणताही राजकीय पक्ष असो, कुणीही कुणाचा मोहताज नाही. त्यामुळे थांबवण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेत आणखी बळ कसं येऊ शकतं याकडे लक्ष दिलं पाहिजे. तितकं मला समजतं. पण अशी बात आमच्या संघटनेत नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.