Sharad Pawar | ‘जे येणार नाहीत त्यांना दूर करु’, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Sep 01, 2023 | 5:14 PM

इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. बैठकीत काय-काय चर्चा झाली, पुढची रणनीती कशी असेल, याविषयी शरद पवार यांनी यावेळी माहिती दिली.

Sharad Pawar | जे येणार नाहीत त्यांना दूर करु, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Follow us on

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपवर सडकून टीका केली. भाजपकडून विरोधकांना घमंडी म्हटलं गेलं. पण घमंडी कोण आहे ते देशाला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत काय-काय चर्चा झाली, पुढची रणनीती काय असेल त्याविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी भाजपला मोठा इशारा दिला.

“सर्व राजकीय पक्षाचे नेते इथे आले. सर्वांची व्यवस्था करण्याची जबाबदारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी योग्यपणे पार पाडली. पुढची रणनीती ठरवण्यात आम्हाला खूप मोठी मदत झालीय. देशात अनेक समस्या आहेत. शेतकरी, तरुण, मजूर अनेकांच्या अनेक समस्या आहेत. ज्या लोकांनी भाजपला देशाची जबाबदारी दिली त्याच लोकांमध्ये नाराजी आहे”, असं शरद पवार म्हणाले.

‘भाजपच अहंकारी’, पवारांची टीका

“सत्ता हातात आल्यानंतर त्यांच्यात वेगळे परिणाम पडले. राजकारणात राजकीय पक्ष एकत्र काम करण्याचं ठरवतात तर त्यांचं काम, नीती याबाबत काही शंका असू शकते, पण आमची इथे बैठक करण्याचं ठरलं तर त्यावरही भाजपने टीका केली. ते म्हणाले, भेटायची काय गरज आहे? आम्ही इथे भेटलो म्हणून काही जणांनी टीका केली”, असं शरद पवार म्हणाले.

“यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, देशाची सत्ता हातात आल्यानंतर, जमिनीवर पाय ठेवणारं नेतृत्व खूप लांब गेलं आहे. विरोधकांबद्दल भाजपचे वरिष्ठ नेता घमंडिया असा उल्लेख करुन टीका करतात. यातून एकच गोष्ट दिसते, अहंकारी कोण आहे, लोक एकत्र मिळून बैठक घ्यायला तयार नाही, त्याला अहंकारी म्हणतात”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

“ही शक्ती देशासाठी योग्य नाही. त्यासाठी आम्ही काहीजण अनेक दिवसांपासून चर्चा करत होतो. त्यातून आम्ही इंडिया आघाडी हा नवा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही जे करतोय ते देशासमोर ठेवण्याचं काम केलं. आम्ही थांबणार नाही, चुकीच्या जागेवर जाणार नाहीत. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्यांना चांगल्या मार्गावर आणू, जे येणार नाही त्यांना दूर करण्याचं काम आम्ही खांद्याला खांदा लावून करु. देशासमोर एक चांगलं स्वच्छ शासन निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करु”, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.