उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांनी पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल काही महत्त्वाचे संकेत दिले. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटातील युवा नेता धीरज शर्मा यांनी आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. यावेळी अजित पवारांनी आपली भूमिका मांडली. “धीरज शर्मा यांच्यावर आधीच जबाबदारी होती. त्यांच्यासोबत अंसख्य सहकाऱ्यांनी आज प्रवेश केला आहे. 10 जून 1999 साली स्वाभिमानातून आपण पक्ष स्थापन केला. आपण परदेश मुद्दा समोर ठेऊन पक्ष काढला आणि 4 महिन्यात त्याच मुद्द्याला बाजूला ठेवून आपण सत्तेत गेलो. नंतरच्या काळात काही जणांचं पक्षात महत्त्व वाढलं आहे. प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचं असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हावी”, असं अजित पवार म्हणाले.
“आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागचा वेळी 41 जागा भाजप-युतीच्या होत्या. तर विरोधक 7 जागांवर होते. त्यामुळे आपल्याला यंदा जागा कमी मिळाल्या. सातारची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी जागा सातारला देण्यात येणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. सातारची राज्यसभेची जागा आपण सातारला देणारं आहोत. इतरांनी मागणी करू नये”, असा इशारा अजित पवारांनी मित्रपक्षांना दिला.
“आपण 10 जूनला पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. राष्ट्रीय पक्ष म्हणून आपल्याला मान्यता मिळवायची आहे. आजचा पक्ष प्रवेशामुळे आपल्याला बळ मिळालं आहे. पुढील अधिवेशन षण्मुखानंद की दिल्लीत तालकठोरा मैदान येथे घ्यायचं याबाबत निर्णय लवकरच घेतला जाईल. कारण 10 जूनला काही वेगळा निर्णय झाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे) तर आपलं अधिवेशन मागे-पूढे होऊ शकतं”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“आम्ही बैठका घेतो ते टीव्ही मीडीयाला दाखवत बसत नाहीत. आपण नितीन किरिर यांच्यासोबत आधीच बैठक घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहावं आणि आचारसंहिता शिथिल करण्याबाबत सांगितलं होतं. आज कदाचित याबाबत निर्णय होईल”, असं अजित पवार म्हणाले.
मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 80 ते 90 जागांची मागणी केली आहे. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. “पक्ष वाढीसाठी भुजबळांना काळजी वाटणं हे साहजिकच आहे. सर्वांचाच मानसन्मान ठेवला जाणार. जागावाटपात सुरुवातीपासूनच लक्ष घातले जाणार. नाशिकच्या जागेसाठी विलंब झाला. स्थानिकांनी बोलून दाखवलं. विलंब झाला याचा फटका पक्षाला बसलाय”, अशी कबुली अजित पवारांनी दिली.