मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपची खिल्ली उडवली आहे. या जाहिरातीत राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक 26 टक्के कौल दाखवण्यात आला आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून 23 टक्के कौल दाखवण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेतील मतभेद समोर आला असतानाच अजित पवार यांनी सत्ताधारी दोन्ही पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच अजित पवार यांनी भाजपची खिल्ली देखील उडवली आहे.
“एकनाथ शिंदे किंवा ती जाहिरात देणारे एवढ्यालवकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कसे विसरले ते मला काही कळलं नाही. कारण मुळातच त्यांनी आम्ही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत असं म्हणत शिवसेना पक्ष स्वत:कडे खेचून घेतला. पण त्यांच्या जाहिरातीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसला नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“स्वत:च ठरवून सर्वेक्षण केलं. कुणी सर्वेक्षण केलं, एक्झिट पोल येतात तेव्हा तो सर्व्हे कुणी केला ते सांगितलं जातं. अशाप्रकारची सर्वेक्षणाची जाहिरात पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक विश्वविक्रमच केला. जाहिरात कशासाठी केली जाते? तर आपण केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचावं किंवा वेगवेगळ्या एजन्सीज जाहिरातीवर मोठा खर्च का करतात? लोकांना माहिती होण्यासाठी. यांचं काम एवढं चांगलं असेल तर पानभर अशाप्रकारची जाहिराती?”, असा सवाल अजित पवारांनी केला.
“विशेष म्हणजे त्या जाहिरातीत जो सर्व्हे दाखवलाय त्यानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी लोकांनी सर्वाधिक कौल दिलेला आहे. त्यांना एक नंबर देण्यात आला आहे. मला खूप आनंद वाटला की चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री व्हावे, असं वाटत आहे. इतक्या लोकांचा पाठींबा आहे तर मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका का घेत नाहीत? त्यांना निवडणूक घेण्याची भीती वाटते”, असा दावा अजित पवारांनी केला. तसेच पवारांनी यावेळी सरकारला उद्याच स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका घेऊन दाखवा, असं चॅलेंजही दिलंय.
“शिवसेना आमचीच अशाप्रकारचा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो टाकला आहे. बरोबर आहे. मोदींमुळेच ते मुख्यमंत्री झाले आहेत. स्वत:चा सुद्धा फोटो टाळला. पण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोयिस्करित्या वगळलेला आहे. हा बाळासाहेबांचा अपमान नाही का?”, असा सवाल अजित पवार यांनी केला.
“एकीकडे तुम्ही लोकांना सांगता, बाळासाहेबांच्या विचारांना सोबत घेऊन पुढे चाललो आहोत आणि उद्धव ठाकरे यांनी त्या विचारापासून फारकत घेतली आहे, असं तुम्ही सांगत होते. राज्याच्या विकासाचे प्रश्न त्यांनी पद्धतीशीर दुर्लक्ष केलं आहे. किती विकासकामं केली, किती रोजगार दिला, किती जीडीपी वाढला, याबाबत माहिती जाहिरातीत हवी होती. पण मी स्वत:च किती लोकप्रिय याची स्पर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या मंत्र्यांमध्ये दिसलीय”, अशी टीका अजित पवारांनी केली.
“गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण ऐकलं होतं. केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र, अशी घोषणा ऐकली होती. पण आता जाहिरातीतून नवीन घोषणा करण्यात आली आहे. केंद्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनाही ही घोषणा द्यावी लागेल. हे भाजप नेत्यांना मान्य आहे का? याचा खुलासा करावा”, अशी मागणी अजित पवारांनी केली.
“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नेहमी खुलासा करत असतात. त्यामुळे या जाहिरातीवर बावनकुळे यांचा खुलासा ऐकायला आवडेल. हा तुमचा पक्षांतर्गतला प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल, अजित पवारांनी नाक खुपसायचं काय कारण? पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात जाहिरात आहे. तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर सरकार आहे”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपची खिल्ली उडवली.
“फडणवीसांपेक्षा शिंदेंना जास्त जनता अनुकूल झालीय असं जाहिरातीत दाखवलं आहे, हे भाजपला मान्य आहे का? शिंदेंच्या बाजूने 26 टक्के कौल दाखवलाय आणि फडणवीस यांच्या बाजूने 23 टक्के कौल दाखवला आहे. अशाप्रकारच्या जाहिराती यांना का द्याव्याशा वाटत आहे ते माहिती नाही. सरकारी जाहिरात असती तर म्हटलं असतं पण त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या खर्चावर जाहिरात केली आहे. पण जनता काय इतकी दुधखुळी नाहीय”, असंही पवार यावेळी म्हणाले.