राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सिद्दिकी यांचे पुत्र, आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या निर्मलनगर परिसरातील कार्यालयाबाहेरच घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून पळ काढत असलेल्या तिघांपैकी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शनिवारी या हल्ल्याच्या काही तास पूर्वीच सिद्दिकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास त्यांनी ही पोस्ट लिहिली होती. या पोस्टद्वारे त्यांनी सर्वांना दसराच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दुर्दैवाने हीच त्यांची अखेरची पोस्ट ठरली. ‘सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. हा दसरा तुम्हा सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो’, अशी त्यांनी पोस्ट लिहिली होती.
काँग्रेस पक्षातून तीन वेळा आमदार आणि 2004-2008 या काळात मंत्री राहिलेले सिद्दिकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. राजकीय वर्तुळात प्रसिद्ध असलेले सिद्दिकी यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं वृत्त समजताच रात्री उशिरापर्यंत लिलावती रुग्णालयात नेते, कलाकार यांची रीघ लागली होती.
Happy #Dussehra Everyone!!!
May this Dussehra bring you all happiness, peace and prosperity ✨ pic.twitter.com/THk9Z4Wi0M— Baba Siddique (@BabaSiddique) October 12, 2024
वांद्रे इथल्या एका झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून सिद्दिकी यांचे काही वाद होते, असं समजतंय. मात्र हत्येमागील नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सिद्दिकी हे आपल्या आमदार पुत्राच्या कार्यालयाबाहेर आले असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिघांपैकी दोघांनी त्यांच्यावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी सिद्दिकी यांच्या छातीत लागल्याचं समजतंय. या गोळीबारात सिद्दिकी यांच्याबरोबर असलेली एक व्यक्ती जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.