महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी पुन्हा महत्वाची घडामोड झाली. रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “टीव्ही ९ मराठी”शी बोलताना आपली भूमिका मांडली. मेळाव्यात काल असलेल्या रिकाम्या खुर्च्या पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असणार? यामुळे ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, काल मेळाव्यात रिकाम्या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील. त्यामुळे ते गेली असतील. तसेच शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर त्यांचे मत काय? हे सांगण्यास शरद पवार यांच्याकडे गेले. या सर्व प्रकारानंतर शरद पवार यांनी मोठ्या मनाने त्यांचे दरवाजे उघडले. हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. वैयक्तीक द्वेष करुन खोट्या केसेसमध्ये अडकवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन केला. आरक्षणासंदर्भातील हा विषय आहे. परंतु गेली दोन वर्ष चर्चे भुजबळ यांनी चर्चेला बोलवले नाही. न मराठ्यांच्या चर्चेत बोलवले ना ओबीसींच्या चर्चेत बोलवले. पण आज बोलवत आहे. आम्हालाही स्वत:चे वैयक्तीक काही आहे की नाही? आता शरद पवार यांची भेट कशासाठी आहे, हे मला माहीत नाही आणि ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सोमवारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.