मुंबई: उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या. त्यामुळे महागाई आवरती घ्या… महागाईवर (inflation) काहीतरी बोला…अन्यथा पुढचा काळ कठीण आहे, असा इशारा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा. गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय. मात्र आपण फक्त मीडिया (media), पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पाहतो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे. एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी हा इशारा दिला आहे. मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर 7.2 होता. आता महागाईचा दर 14 वर पोचला आहे. याचा अर्थ 70 वर्षात महागाई कधी नव्हे एवढी शिगेला पोचली आहे. 70 वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती. आता जागतिक बाजारात महागाई नाहीये. पण आपल्या देशात आहे, याची आठवणही जितेंद्र आव्हाड यांनी करुन दिली आहे. धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांचे उदाहरणही त्यांनी दिले.
दरम्यान, एकीकडे देशासह राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे राजकारण सुरु असताना, कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘सर्वधर्म’ प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आयोजन केलेल्या ‘सर्वधर्म’ प्रार्थनेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने आज साऱ्या देशासमोर सामाजिक-धार्मिक सलोख्याचा आदर्श ठेवला आहे. यावेळी भारतीय संविधानाच्या संरक्षणार्थ देशभरात धार्मिक आणि जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहो, अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच संविधान वाचून व राष्ट्रगीत गाऊन या प्रार्थनेची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह जिल्हा कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील, रमेश हनुमंते, सारिका गायकवाड, मायाताई कटारिया, संदीप देसाई, सुरेश जोशी, अर्जुन नायर, विजय मोरे, इम्रान खान, विकास सिंग, वैशाली साखळकर, मिर्झा हुजूर कुरेशी, प्रेम फडतरे, सुनील शिंगारे, मीनाक्षी अहिरे, नोवेल साळवे आणि सर्वधर्मीय नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित बातम्या:
Jayant Patil: आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही: जयंत पाटील