मुंबई : राज्य आणि देशभरात सध्या ईडीकडून (ED) कडक कारवाई केली जात आहे. देशभरातील अनेक बड्या नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. राज्यात ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना दापोली येथील रिसोर्ट प्रकरणी ईडीने नुकतंच अटक केली आहे. तर दुसरीकडे ईडीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर पुन्हा धाड टाकली. विशेष म्हणजे सलग नऊ तासांच्या धाडसत्रानंतर ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. ईडीच्या आज दिवसभराच्या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांच्या घराबाहेर ईडी कारवाईविरोधात ठिय्या मांडला. या सगळ्या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप खासदार संजयकाका पाटील यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल करण्यात येतोय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट केलंय. संबंधित ट्विटमध्ये संजयकाका पाटील यांचा व्हिडीओ जोडण्यात आलाय, ज्यामध्ये संजयकाका पाटील यांनी आपण भाजप खासदार असल्याने आपल्या पाठीमागे ईडी लागणार नाही, असं वक्तव्य केलंय. संबंधित व्हि़डीओसोबत तपासे यांनी “आमचा संशय खरा ठरला, आता खुद्द खासदार संजयकाका यांनीच कबुली दिली. भाजपचं आता काही म्हणणं आहे का? विरोधकांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर, असं महेश तपासे म्हणाले आहेत. दरम्यान, संजयकाका पाटील यांना संबंधित वक्तव्याचा व्हायरल व्हिडीओ हा दीड वर्षांपूर्वीचा आहे. संबंधित व्हिडीओ हा याआधी 24 ऑक्टोबर 2021 रोजी समोर आलेला.
“या ठिकाणी या मॉलच्या उद्घाटनासाठी आपण इथे जमलो आहोत. भाऊंनी मगाशीच सांगितलं की, मी पत्रकारांना तिकीट काढून देतो. मला वाटतं चार तारखेला चित्रपट आहे. सूर्यवंशी असं चित्रपटाचं नाव आहे. मी थोडा बघितला आहे. म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर पाहिलाय. नाहीतर म्हणाल प्रदर्शित होण्याआधी कसा पाहिला? यांना स्पेशल का? अडचण असू नये. आम्ही थोडा ट्रेलर पाहिला. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दोन स्क्रिन उभ्या राहिलेल्या आहेत. चांगल्या संकल्पेनेतून आणि चांगल्या विचारण्यातून हे उभारण्यात आलं आहे. तरुण पिढी चांगल्या दृष्टीकोनातून व्यवसाय करत आहे. हे निश्चितच चांगलं काम आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो”, असं संजयकाका म्हणतात.
“वैभव दादा भाषणं इकडे तिकडं झालं तरी वैभव दादांनी मला आज आकडे सांगितलेले नाहीत. तरी त्यातल्या त्यात बिनकामाचा माणूस मला वैभव दादा दिसतोय म्हणून मी वैभव दादाचं नाव घेतलं. अशोक भाऊंचं काय कर्ज काढायचा विषय नाही. कर्ज उद्योगी उभं करण्याचं काम अशोक भाऊ करतात”, असं संजयकाका म्हणाले. यावेळी मंचावर बसलेल्यांपैकी कुणीतरी ईडीचा मुद्दा काढला. त्यानंतर संजयकाका म्हणाले, “नाही. वैभव दादा ईडी मागे लागत नाही. कारण मी भाजपचा खासदार आहे. मी भाजपचा खासदार आहे त्यामुळे ईडी येणार नाही”, असं संजयकाका स्पष्ट म्हणतात. त्यांच्या याच वक्तव्याचा व्हिडीओ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्हायरल करण्यात येतोय.