‘त्याचे’ काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना समजेल; मेहबूब शेख यांचं सूचक ट्विट

| Updated on: Dec 16, 2022 | 12:59 PM

मेहबूब शेख यांनी एकूण चार ट्विट केले आहेत. तसेच कोर्टाच्या ऑर्डरची प्रतही पोस्ट केली आहे. संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलू नये याचेही नियम दिले आहेत.

त्याचे काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना समजेल; मेहबूब शेख यांचं सूचक ट्विट
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबुब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यांचा दावा कोर्टाने दाखल करून घेतला आहे. दावा कोर्टाने दाखल करून घेताच मेहबूब शेख यांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरापर केला तर काय परिणाम होतात हे आता चित्रा वाघ यांना समजेल, असं ट्विट मेहबूब शेख यांनी केलं आहे.

 

हे सुद्धा वाचा

मेहबूब शेख यांनी एकूण चार ट्विट केले आहेत. तसेच कोर्टाच्या ऑर्डरची प्रतही पोस्ट केली आहे. संविधानाने बोलण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असले तरी काय बोलू नये याचेही नियम दिले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर आणि त्याचाच गैरवापर केला तर काय परिणाम होतात हे चित्रा वाघ यांना आता लक्षात येईल, असं मेहबूब शेख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

स्वतः न्यायाधीश असल्यासारखे एखाद्याला आरोपी ठरवून बेताल वक्तव्य करताना यापुढे विचार करा. स्वतःला न्यायधीश समजणाऱ्या चित्रा वाघ यांनी शिरूर कासार येथे येऊन माझ्या विषयी जे बदनामीकारक वक्तव्य केले, त्याच्या विरोधात मी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती, अशी माहिती त्यांनी या ट्विटमध्ये दिली आहे.

त्यानंतर शिरूरच्या न्यायालयामध्ये कलम 499 आणि 500 प्रमाणे क्रिमिनल डिफेमेशनची खासगी तक्रार दाखल केली होती. कोर्टाने कलम 202 प्रमाणे पोलीस चौकशी करून त्या पोलिस चौकशीच्या अहवालाच्या नंतर सदरील तक्रारीची दखल घेऊन ते स्वीकृत केले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

काही लोक जे स्वतःला न्यायाधीश समजण्याच्या नादात इतरांची बदनामी करतात आणि आपणच खूप शहाणे असल्याचं समजतात. त्या त्या लोकांच्या विरोधात न्यायालयीन लढाईचे हे माझे पहिले पाऊल आहे. आज कोर्टाने माझ्या दाव्याची दखल घेतली आहे.

स्वतःला अतिहुशार समजणाऱ्याला आणि लोकांची बदनामी करत बेताल वक्तव्य करणाऱ्याचा निश्चितपणाने कायदेशीर बंदोबस्त करण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

एका तरुणीने मेहबूब शेख यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं. चित्रा वाघ यांनी हा मुद्दा उचलून धरत शेख यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर या मुलीने घुमजाव करत चित्रा वाघ यांनीच आपल्याला तसे आरोप करायला सांगितल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे शेख यांनी कोर्टात धाव घेतली होती.