मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. मलिक यांना गेल्या अनेक दिवसांपासून किडनीशी संबंधित आजार आहे. त्यांची एक किडनी निकामी झाली असल्याची माहिती त्यांचे लहान भाऊ कप्तान मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली. नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर कप्तान मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते प्रचंड भावूक झाले. कप्तान मलिक प्रतिक्रिया देताना अक्षरश: ढसाढसा रडले. त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले.
गेल्या दीड वर्षांपासून आमचं कुटुंब कोणत्या संकटातून जात होतं हे आपण शब्दांमध्ये सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया कप्तान मलिक यांनी दिली. यावेळी त्यांना रडू कोसळलं. नवाब मलिक हे गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. त्यांच्यावर जे जे रुग्णालयातही उपचार सुरु होते. याशिवाय खासगी रुग्णालयातही उपचार करण्यात आले. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने मलिक यांच्यावर उपचार करण्यासाठी दोन महिम्यांचा जामीन मंजूर केलाय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर मलिक कुटुंबियांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.
“सर्वप्रथम सुप्रीम कोर्टाने आमची दोन महिन्यांसाठी बेल मंजूर केली यासाठी मी सुप्रीम कोर्टाचा अतिशय आभारी आहे. नवाब मलिक यांची प्रकृती एक वर्षापासून खूप खराब झाली होती. त्यांची एक किडनी फेल झाला होता. अखेर त्यांना उपचाराच्या पार्श्वभूमीवर एक महिन्यांसाठी जामीन मंजूर झालाय. त्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत”, असं कप्तान मलिक म्हणाले.
“नवाब मलिक माझे मोठे बंधू आहेत. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. 10 वर्षे झाले, आमचे वडील या जगात नाहीयत. नवाब मलिक आमचे वडील आणि भाऊ दोन्ही होते. दीड वर्षात आमच्या कुटंबासोबत जे घडलं आहे, आम्ही कसे दिवस काढले ते आम्हालाच माहिती”, असं बोलत असताना कप्तान मलिक यांना रडू कोसळलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीदेखील नवाब मलिकांच्या जामिनावर प्रतिक्रिया दिलीय. मलिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही आमची बाजू मांडू, असं सुनील तटकरे म्हणाले आहेत. “दिर्घ काळ प्रतिक्षेनंतर आज नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. आम्हाला सर्वांना या गोष्टीचं समाधान आहे. कारण गेले 25 ते 30 वर्षात त्यांनी मुंबईत आपल्या कार्यप्रणालीचा ठसा उमटवला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करतो”, असं सुनली तटकरे म्हणाले.
नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. पण आता अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झालाय. त्यामुळे मलिक सोबत आले तर अजित पवार गटाची काय भूमिका असेल? असा सवाल सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर सुनील तटकरे यांनी “नवाब मलिक हे स्वत: दिर्घकाळ राजकारण करणारे प्रगल्भ असे नेते आहेत. त्यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू”, अशी प्रतिक्रिया दिली.