मुंबई: वक्फची कोणतीही जमीन मी हडप केली नाही. पण पुण्यातील भाजपच्या दोन लोकांनी वक्फच्या जमिनी हडप केल्या आहेत. त्यांच्यावर लवकरच एफआयआर दाखल केला जाणार आहे. त्यांनी लवकरच अटक होईल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. सोमय्या तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच. मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही, असा इशारा देतानाच आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार आहे, असे सूचक विधान मलिक यांनी केलं.
ईडीने ऑफिशियल बातमी दिली पाहिजे. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती द्या असे पत्राद्वारे विचारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमय्या यांनी खासदार असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती मी येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहे. सोमय्यांना ईडीचा प्रवक्ता घोषित केले पाहिजे. मी दररोज सकाळी दरवाज्यात पुष्पगुच्छ घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत असतो. यापुढेही आले तर त्यांचे स्वागतच करू. परंतु ज्यापद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर सात ठिकाणी छापा मारला अशा बातम्या पेरल्या होत्या. त्याच उत्तर त्याचदिवशी दिलेले होते, असे मलिक यांनी सांगितलं.
काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा, इशारा देतानाच सोमय्या हे नवाब मलिक यांना अटक होणार आहे असे सांगत आहेत. सोमय्या तुम्ही ईडीचे प्रवक्ते झाल्याचे नियुक्तीपत्र घ्या. ईडीलाही एका चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे. सोमय्यांना निदान पगार तरी सुरु होईल, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी ईडीवर गंभीर आरोप केला. आमच्या एका अधिकाऱ्याला ईडीचे अधिकारी दोन दिवस बोलावून तुम्ही एण्डोमेंट बोर्डाचा चुकीचा एफआयआर दाखल केलात काय गरज होती? अशी विचारणा करत आहेत. माझ्याविरोधात काही सापडत नसल्याचं पाहून एफआयआर चुकीचा आहे असं सांगितलं जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. तुम्हाला जी काही कारवाई करायची ती करा. पण बातमी पेरण्याचे काम बंद करा, असा इशाराही त्यांनी दिला.
Video | MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 11 December 2021#News | #NEWSUPDATE https://t.co/eUjpv31kyT
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का?; नारायण राणे यांचा सुप्रिया सुळेंना सवाल
राज्यात मविआ सरकारनं अराजक माजवलं, ‘सामना’तील टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर