मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या अवमानकारक उद्गारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी महाराजाांवर विधान करून राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं हे शहाणपण होतं, असं सांगतानाच राज्यपालांच्या विधानाची दखल आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच घ्यावी. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. वाद आहे असं वाटत नाही. राज्यपाल जेव्हा बोलले तेव्हा तिथे मी आणि नितीन गडकरी होतो. त्यांनी तो उल्लेख केला. तो माझ्याबद्दल नव्हता. गडकरींबद्दल होता, असं शरद पवार म्हणाले.
अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधाने करणं हे या राज्यपालांचं वैशिष्ट्ये आहे. आणि तसा त्यांचा लौकीक आहे. चुकीची विधानं करणं, समाजात गैरसमज कसा माजेल याची खबरदारी घेणं असं त्यांचं मिशन आहे की काय ही शंका येते, अशी शंका पवारांनी उपस्थित केली.
फुले दाम्पत्यांबद्दलचा उल्लेख आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी वादग्रस्त उल्लेख केला आहे. या पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, याचं स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यपाल ही संस्था आहे. या संस्थेची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून मी यापूर्वी जास्त बोललो नाही. पण शिवाजी महाराजाांवर विधान करून त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या आहेत. काल त्यांनी शिवाजी महाराजांचं कौतुक केलं. पण राज्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांना उशिरा सूचलेलं शहाणपण होतं. राज्यपालांच्या या विधानाची दखल राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी घ्यावी. अशा व्यक्तीकडे अशा जबाबदाऱ्या देणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.
मी असतो तर पदवी घेतली नसती, असं उदयनराजे भोसले म्हणाले. त्यावर विचारले असता, पदवी वगैरे हे आधी झालं. आधी पदवीदान सोहळा झाला. नंतर आमची भाषणं झाली. शेवटी राज्यपाल बोलले. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. तुम्ही मोठे गृहस्थ आहात, असा टोला शरद पवार यांनी उदयनराजेंना लगावला.