मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. त्याने केलेल्या टिप्पणीवर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढलं आहे. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असतीर तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं आहे.
विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. हे सर्व प्रकरण पाहून मला मजेदार किस्सा आठवला. भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं. बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले त्याविषयी ट्विट केलं तर बरं होईल. उगाचच मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला राजकारणात ओढणं बरं नाही. लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवींना मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं असेल तर आपल्याला त्याचं कौतुकच वाटलं पाहिजे. परंतु ज्या प्रकारे रश्मी ठाकरेंचं नाव घुसवण्याचं काम केलं जात आहे, त्यावरून भाजपच्या सेलला अक्कल राहिली नाही हे लक्षात येतं. ते डबक्यात आहेत. कमळ हे डबक्यात उगवतं. डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये. कारण तुम्ही डबक्यात आहात. तुम्ही काय आहात, भाजपमध्ये कोण काय आहे त्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे. कोणत्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही रश्मी ठाकरेंवरील ट्विटचा निषेध नोंदवला आहे. भाजपने विद्यापीठ सुरू करावं. कसं ट्रोलिंग करावं एखाद्याला कसं आयुष्यातून उठवावं याचा कारखाना म्हणजे भाजप आहे. भाजपला काही काम नाही. त्यामुळे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ही शिकलेली माणसं आहेत. भाजप यांना महिन्याला 25 हजार पगार देते असं आम्ही ऐकलंय. विकृत मनोवृत्तीची ही माणसं आहेत. सर्व ट्रोलला अद्दल घडली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या पोलिसांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जितेन गजारीया हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती.
संबंधित बातम्या:
रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजप पदाधिकारी ताब्यात, प्रकरण काय? वाचा सविस्तर
Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट