राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात ते भीषण जखमी झाले होते. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. समीर खान यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत होती. पण त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवाब मलिक यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “माझे जावई समीर खान यांचे निधन झाले आहे. अल्लाह त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देवो. या नुकसानीबद्दल आम्ही शोक व्यक्त करत आहोत”, असं नवाब मलिक ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच या दुखद घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
Inna lillahi wa inna ilayhi raji’un.
My son-in-law, Sameer Khan, has passed away. May Allah grant him the highest place in Jannah. As we mourn this loss, all my scheduled for the next two days are postponed. Thank you for your understanding, Please keep him in your prayers.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2024
समीर खान 18 सप्टेंबरला पत्नी निलोफर यांच्यासोबत रुटीन चेकअपसाठी कुर्ल्यात आपल्या घराजवळ असलेल्या क्रिटी केअर हॉस्पिटल येथे गेले होते. त्यांचं रुटीन चेकअप झाल्यानंतर त्यांनी आपल्या ड्रायव्हरला फोन करुन ड्रायव्हरला हॉस्पिटलबाहेर गाडी आणण्यास सांगितली होती. त्यांचा गाडीचालक थार गाडी घेऊन तिथे आला. पण त्याच्याकडून एक गंभीर चूक झाली. त्याने समीर खान यांच्याजवळ आल्यावर ब्रेकवर पाय ठेवण्याच्या ऐवजी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. यामुळे समीर खान यांना थार गाडीने फरफटत नेलं. तसेच या गाडीने अनेक दुचाकींना देखील तुडवल्याची माहिती आहे.
या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या चेहऱ्यालादेखील दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. समीर खान यांच्या पत्नी निलोफर यांच्यादेखील हाताला दुखापत झाली होती. पण त्या या अपघातातून सुखरुप बचावल्या. पण समीर खान यांना गंभीर दुखापत झाल्याने आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, या प्रकरणातील गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.