आज काहीतरी मोठं घडणार का? दिलीप वळसे पाटलांना प्रश्न विचारताच….

| Updated on: Nov 25, 2024 | 5:03 PM

आमदार दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वळसे पाटील यांनी या भेटीचे कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीशी जोडले असले तरी, शरद पवार गटातील आमदारांच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क रंगले आहेत.

आज काहीतरी मोठं घडणार का? दिलीप वळसे पाटलांना प्रश्न विचारताच....
आज काहीतरी मोठं घडणार का? दिलीप वळसे पाटलांना प्रश्न विचारताच....
Follow us on

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत. असं असताना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे पाटील आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना अशावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर आपल्या भेटीचं कारण सांगितलं आहे. यावेळी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक चालू आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

“शरद पवारांची भेट झाली. कारण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची आज बैठक होती. मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा विश्वस्त या नात्याने या बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर अतिशय उपयुक्त अशी चर्चा झालेली आहे. राजकीय चर्चा झाली नाही. फक्त प्रतिष्ठानची चर्चा झाली. दुसरी काहीही चर्चा झाली नाही. निकालांच्या चर्चांसंदर्भात चर्चा झाली. पण ती महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघात काय-काय घडलं, याबाबत चर्चा झाली. माझ्या स्वत:च्या मतदारसंघातील निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. मी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. ते सभेत काय बोलले आणि काय नाही ते सर्व मी विसरुन गेलेलो आहे. मी फक्त त्यांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला. बाकी काही नाही”, असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं.

अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं का?

ईव्हीएमबद्दल शरद पवार काही बोलले का? असा प्रश्न दिलीप वळसेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “शरद पवार त्यांच्या वतीने ते काय बोलले हे मला सांगणं उचित नाही. पण त्यांनी जनरल चर्चा केली आणि एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होती, असं त्यांचं मत आहे”, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र यावं का? पक्ष एक व्हावा? असं वाटतं का? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “अजून तरी तशी चर्चा किंवा विचार कुणाच्या समोर आलेला नाही”, असं वळसे पाटील म्हणाले.

अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक?

अजित पवार यांची शरद पवार गटाच्या आमदारांसोबत गुप्त बैठक सुरु असल्याची चर्चा आहे. अशा आमदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आहे. तुम्हाला याबाबत काही कल्पना आहे का? असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला याबद्दल काही कल्पना नाही, असं उत्तर दिलं. मला माहिती नाही. माझ्याशी तरी कुणाचं याबाबतीत बोलणं झालेलं नाही. त्यामुळे कोण येणार वगैरे याबाबत आता बोलणं उचित नाही. तशी कुठे चर्चा झाली असेल असं मला वाटतही नाही”, असं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.